होमपेज › Konkan › लांजा बाजारपेठ कडकडीत बंद

लांजा बाजारपेठ कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:38PM

बुकमार्क करा
लांजा : प्रतिनिधी 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, या सरकारचे करायचे काय... खाली डोक वर पाय, हमसे जो टकरायेगा, वो मिट्टीमे मिल जाएगा, तुमचं- आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी दुपारी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या जाहीर निषेध करण्यासाठी  सर्व जाती धर्मांतील समाजबांधव मुंबई - गोवा महामार्गावर लांजा येथे उतरले. 

भीमा-कोरेगाव येथे दि. 1 जानेवारी रोजी शौर्यदिनी विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम सैनिकांवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक देण्यात आली होती. या हाकेला लांजा शहरातील दुकानदारांनी  सहकार्य करून बंद पाळण्यात आला. काही दुकाने चालू होती, त्या दुकानदारांना मोर्चेकर्‍यांनी  दुकाने बंद करण्याची विनंती केली.  त्यानुसार संपूर्ण लांजा शहरातील कडकडीत बंद पाळण्यात आला होता. 

लांजा तालुक्यातील बहुजन विचार मंच,  भारिप बहुजन महासंघ,  बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,  कुणबी समाज सेवा संघ,  मराठा सेवा संघ,  भारतीय बौद्धजन महासभा लांजा तालुका बौद्धजन संघ, मुस्लिम समाज, रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या वतीने बुधवारी दुपारी 11.30 वा. लांजा बाजारपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन   येथून पोस्ट गल्ली,  मुंबई - गोवा महामार्गावरून एस.  टी.  बसस्थानक असा मोर्चा काढण्यात आला. 

मोर्चेकर्‍यांनी बसस्थानकासमोरच ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला.  पाच ते दहा मिनिटे महामार्गावर मोर्चेकर्‍यांनी रोखून धरल्याने महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येऊन धडकला व तहसीलदार मारूती कांबळे यांना शिष्टमंडळाने निवेदन  दिले.