लांजा : प्रतिनिधी
रानटी जनावरांच्या शिकारीसाठी वाघ्रट रांबाडेवाडी येथे लावण्यात आलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याच्या मादीची वन विभागाच्या कर्मचार्यांनी पिंजर्यात बंदिस्त करून सुटका केली. तिच्यावर औषधोपचार करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी काजर्याचा पर्या येथे सुरेश रांबाडे यांची आंबा -काजूची बाग आहे. या ठिकाणी रांबाडेवाडी येथील ग्रामस्थ चंद्रकांत पन्हळेकर व संतोष सोनू भुवड हे जात असताना शनिवारी सकाळी 6.30च्या सुमारास त्यांना तेथे रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याच्या मादीची डरकाळी ऐकू आली आणि त्यांची भीतीने गाळण उडाली. डरकाळी ऐकून या दोघांनी धूम ठोकली. या घटनेची माहिनी वन विभागाच्या कर्मचार्यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली.
दरम्यान, माहिती मिळताच लांजा वन विभागाचे परिमंडळ वनाधिकारी व्ही. वाय. गुरवळ वन रक्षक विक्रांत कुंभार, राहुल गुंठे यांनी घटनास्थळी जावून खात्री केली असता सुरेश रांबाडे यांच्या बागेतील वाटेलगत एका झाडाला केबलच्या सहाय्याने रानटी जनावरांसाठी शिकार करण्याच्या उद्देशाने अज्ञाताने फासकी लावल्याचे निदर्शना आले. फासकीत अडकल्याने बिबट्यला त्यातून सुटका करुन घेणे अवघड झाले होते. केबलचा फास बिबट्याच्या छातीला आवळला गेला होता. बिबट्याची ही मादी दोन वर्षांची आहे.
माहिती मिळताच लांजाचे वनपाल व्ही. वाय. गुरवळ हे वाघ्रट येथे आल्यानंतर रत्नागिरी येथील परिक्षेत्र वनाधिकारी बा. रा. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती देण्यात आली. मादी जातीच्या या बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. वनपाल गुरवळ हे पिंजरा सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, घटनास्थळी जाण्यासाठी रस्ता नसल्याने या चिंचोळ्या वाटेवरून पिंजरा घेऊन जाण्यासाठी प्रकाश आगरे, योगेश भुवड, संदीप भुवड, विकास कांबळे, सुरज पवार, महेश कांबळ आदी युवकांनी वन खात्याच्या कर्मचार्यांना मदत केली.
जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर फासकीत अडलेल्या बिबट्याला पिंजर्यात सुरक्षित जेरबंद करण्यात यश आले. त्या नंंतर या बिबट्याला वन विभागाच्या रोपवाटिकेमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्यावर औषधोपचार करण्यात आले. तिला पूर्ण विश्रातीनंतर नैसर्गिक आधिवासात मुक्त करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.