Thu, Jul 18, 2019 04:08होमपेज › Konkan › दरड कोसळून महामार्ग ठप्प! 

दरड कोसळून महामार्ग ठप्प! 

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 10:28PMमहाड :  प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास चौपदरीकरणाच्या कामातील मातीची दरड कोसळून महामार्ग जवळपास पाच तास ठप्प झाला होता. महाडजवळ केंबुर्ली गावाजवळ कोसळलेल्या दरडीला काढण्यासाठी स्थानिक प्रशासनाची आपत्ती निवारण टीम एक तास उशिराने आल्याने संताप व्यक्‍त केला जात आहे. सुदैवाने या दरडीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहतुकीची मात्र मोठी कोंडी झाली.

गेल्या चोवीस तासांत 102 मिलिमीटर पावसाची नोंद महाड तालुक्यात झाली. बुधवारपासून चोवीस तासांत झालेल्या मुसळधार पावसाने महाडकरांना पहिली सलामी दिली असून मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाच्या जवळ सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामातील दरड मातीसह पहाटे 5.30 च्या सुमारास कोसळली. या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पाच तास पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम करणार्‍या कंपनीच्या आपत्ती यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून आले.

सुमारे दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर या कंपनीची आपत्ती यंत्रणा प्रत्यक्ष घटनास्थळी पोचल्याबद्दल महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी  आपत्ती यंत्रणेतील सर्व संबंधित विभागांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. यापुढे अशा प्रकारची दिरंगाई झाल्यास त्यांच्याविरोधात 2005 च्या नैसर्गिक आपत्ती कायद्यानुसार सक्‍त कारवाई करण्याचे तंबीही त्यांनी दिली.

महामार्गाच्या दोन्ही दिशांना पाच-पाच कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या ठप्प झालेल्या वाहतुकीत मुंबई दिशेला जाणारी आणि मुंबईकडून कोकणात जाणारी वाहतूक बंद पडली होती. यामध्ये मुंबईला जाणार्‍या तीन रुग्णवाहिका देखील अडकल्याने रुग्णांचे हाल झाले. पहाटे साडेपाच वाजता ही दरड आल्यानंतर कांही प्रवाशांनी पोलिस प्रशासनाला माहिती दिली मात्र स्थानिक पोलिस आणि महामार्ग बांधकाम विभाग तब्बल दिड तासाने घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणापासून महाड शहर अवघे चार किमी अंतरावर असून देखील प्रशासन आणि महामार्ग बांधकाम विभागाची यंत्रणा दरड हटवण्यासाठी उशिराने आल्याने प्रवासी नाराजी व्यक्‍त करत होते.

सकाळी साडेपाच वाजता या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती ती साडेतीन तासांच्या तीन जेसीबी व एक रोलरच्या साह्याने केलेल्या कामा नंतर पूर्ण झाल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्ण सुरू करण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेऊन या ठिकाणी त्यासंदर्भात बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे .
  
पहाटे साडेपाच्या सुमारास घडलेल्या घटनेची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षात गेल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये महाड कक्षातून संबंधित राष्ट्रीय महामार्ग व कंपनीकडे याबाबत पुढील यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले यानंतर सकाळी सातच्या सुमारास  म्हणजे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार तहसीलदार चंद्रसेन सावंत हे घटनास्थळी दाखल झाले राष्ट्रीय महामार्गाची उपकार्यकारी अभियंता श्री गायकवाड हे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर विभागाकडून करण्यात येणार्‍या आपत्ती यंत्रणेची  उपस्थित शासकीय अधिकार्‍यांना माहिती दिली . सकाळी साडेआठ वर्षात प्रथम तीन रुग्णवाहिकांना त्यानंतर नऊच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरू करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे .

प्रशासनाचा दावा फोल ठरला

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदकरीण काम सुरु असून खोदकाम करण्यात आलेल्या कांही जागांवर दरडींचा धोका वर्तवण्यात आला होता. यामुळे स्थानिक महसूल आणि महामार्ग बांधकाम प्रशासनाने आपली जबाबदारी झटकून काम करणार्‍या ठेकदार कंपनीवर सोपवली. ज्या ठिकाणी दरडी येण्याची संभाव्यता आहे त्या ठिकाणी यंत्रणा तैनात ठेवण्याचे कळवले होते. आज आलेल्या दरडीने हा दावा फोल ठरवला आहे. प्रत्यक्षात याठिकाणी दिड तासाने हि यंत्रणा आल्याने प्रवाशी वर्गात संताप व्यक्त केला जात होता. महाड तालुका हा दरडग्रस्त तालुका असल्याने, ज्या ठिकाणी दरड आली त्याठिकाणी कांही भाग सुरक्षित करणे अपेक्षित आहे.

बघ्यांची गर्दी ठरते कामात अडथळा

ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी  बघ्यांची आणि दुचाकींची गर्दी वाढली. त्यामुळे जेसीबी यंत्राला माती काढने अवघड होत होते. तसेच या ठिकाणी डोंगरावरुन दरडीचा काही भाग कोसळण्याची शक्यता होती. याचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीसांनी हि गर्दी सुरक्षित ठिकाणी हलविने गरजेचे होते.  मात्र पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेवून होते. याठिकाणी एका बाजूला नदी आणि दुसर्‍या बाजूला दरड अशी स्थिती असताना देखील सुरक्षेच्या दृष्टीने याकडे दुर्लक्ष होत होते. 

वाहतुक पोलीस प्रशासन सुस्त

महामार्गावर दरड कोसळून एक तास झाला तरी या ठिकाणी कोणताही वाहतुक पोलीस हजर झाला नाही. तसेच महामार्गावरील होणारी वाहतुक कोंडी रोकण्यासाठी खेड मार्गे म्हाप्रळ, राडेवाडी फाटा मार्गे म्हाप्रळ, आणि रायगड मार्गे निजापुर मार्गे पुणे मुंबई कडे जाणारी हलकी वाहतुक वळविने गरडेचे होते. मात्र तसे झाले नाही. पोलीस प्रशासनाकडे आपतकालीन कोणतीच रणनिती नसल्याचे या वेळी दिसुन आले. आपतकालीन विषयावर सर्व विभांगाची तात्काळ बैठक घेणार. - विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी महाड

आजची घटना पाहता आपतकालीन व्यवस्थेला आलेले अपयश पाहता आजच सर्व विभागांची बैठक बोलविणार असुन, आपतकालीन कक्षात रात्री गैरहजर असलेल्या त्या दोन कर्मचार्यांवर कारवाई करणार असल्याचे इनामदार यांनी यावेळी सांगितले. तसेच एल अ‍ॅन्ड टी ला या आगोदरच अशा प्रकारची नोटीस देण्यात आली होती. या बाबत त्यांच्या कडुन खुलासा मागुन, महामार्गवर ज्या ज्या ठिकाणी अशी धोकादायक स्थिती असेल त्या त्या ठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले जातील.