होमपेज › Konkan › कुणकेश्‍वर क्षेत्री उसळल्या भक्‍तीच्या लाटा

कुणकेश्‍वर क्षेत्री उसळल्या भक्‍तीच्या लाटा

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 13 2018 11:01PMश्री क्षेत्र कुणकेश्‍वर : सूरज कोयंडे

‘हर हर महादेव’च्या जयघोष... ‘ओम नम: शिवाय’चा नामजप आणि श्री देव कुणकेश्‍वरच्या नामघोषात कुणकेश्‍वर तीर्थस्थानी मंगळवारी पहिल्याच दिवशी भाविकांचा जनसागर लोटला होता. गुरुवारी पवित्र तीर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.

श्रीदेव कुणकेश्‍वरची प्रथम पूजा डोंबिवली येथील उद्योजक रेखा भास्कर भोईर व स्नेहल सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आली. कुणकेश्‍वर सरपंच सौ. नयना आचरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. पहाटे 4 वा. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, अ‍ॅड.प्रसाद करंदीकर उपस्थित होते. श्री. कुणकेश्‍वराच्या प्रथम पूजेनंतर  पहाटे 2 वा. पासून भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती.

देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या वतीने लोकप्रतिनिधी, महनीय व्यक्‍तींचा सत्कार करण्यात आला. मंगळवारी सकाळी 11 वा. शिवसेना जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक , आ.  नितेश राणे यांनी कुणकेश्‍वराचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुंडलिक नाणेरकर, जि.प. सदस्या सौ. सावी लोके, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ.अमोल तेली, युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे आदी पदाधिकारी व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट 
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटधारक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,कर्मचारी सतर्कतेने काम करत होते. ग्रामस्थांचे भरारी पथकही  समुद्रस्नान करणार्‍या भाविकांवर लक्ष देऊन आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे टेहळणी पथक सतर्क आहे. अग्‍निशामक बंबही तैनात करण्यात आलेले होते.