Sun, Nov 18, 2018 05:44होमपेज › Konkan › देवस्वारी, तीर्थस्नानाने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता

देवस्वारी, तीर्थस्नानाने कुणकेश्‍वर यात्रेची सांगता

Published On: Feb 15 2018 10:30PM | Last Updated: Feb 15 2018 10:10PMदेवगड ः सूरज कोयंडे

दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेची सांगता देवस्वार्‍यांच्या व भाविकांच्या पवित्र तीर्थस्नानाने झाली.  गुरुवारी रात्रीपर्यंत अमावस्या असल्यामुळे समुद्रकिनारी धार्मिक विधी व तीर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. यात्रेमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली.

 अमावस्या असल्यामुळे  यात्रेच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवशीही भाविकांच्या गर्दीचा ओघ वाढला होता. कुणकेश्‍वर भेटीसाठी जिल्ह्यातून कणकवली येथील देव स्वयंभू रवळनाथ, आरे येथील आरेश्‍वर देवी पावणाई, वायंगणी येथील देव रवळनाथ, हुंबरट येथील जेैन पावणादेवी बाणकीलिंग या चार  देवस्वार्‍या आल्या होत्या. या देवस्वार्‍यांनी गुरुवारी पहाटेपासून 
समुद्रात तीर्थस्नानाला जाण्यास सरुवात केली. देवस्वार्‍यांबरोबरच तीर्थस्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. तीर्थस्नान करून परत श्री कुणकेश्‍वरचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे तीन वाजल्यापासून समुद्र किनार्‍यावर धार्मिक विधींना प्रारंभ झाला. देवस्वार्‍या व भाविकांच्या तीर्थस्नानावेळी समुद्रकिनारी सुरक्षा ठेवण्यात आली होती. आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलिस, स्वयंसेवक समुद्रकिनारी सज्ज होते.पोलिसांची स्पीड बोटही सुरक्षेसाठी काही अंतरावर उभी होती. तीर्थस्नान करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर व्यवस्थापन व प्रशासनामार्फतही दक्षता घेतली होती.