Thu, Feb 21, 2019 07:41होमपेज › Konkan › आजपासून महाशिवरात्रोत्सव 

आजपासून महाशिवरात्रोत्सव 

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 10:58PMश्री क्षेत्र कुणकेश्‍वर : सूरज कोयंडे

दक्षिण कोकणची काशी श्रीदेव कुणकेश्‍वरच्या महाशिवरात्र यात्रोत्सवाला मंगळवारपासून (दि. 13) सुरुवात होत आहे. या यात्रेत शिवभक्तांचा मळा फुलणार आहे. ‘भेटी लागे जीवा, लागलीसी आस’ अशी भावना प्रत्येक शिवभक्ताची असून, भाविकांची व व्यापार्‍यांची पावले कुणकेश्‍वरनगरीकडे चालू लागली आहेत. यावर्षी ही यात्रा तीन दिवस चालणार आहे.

श्री देव कुणकोबाच्या भेटीसाठी जिल्ह्यातून कणकवली येथील देव स्वयंभू रवळनाथ, आरे येथील आरेश्‍वर व देवी पावणाई, वायंगणी येथील देव रवळनाथ, हुंबरट येथील जेैन पावणादेवी, बाणकीलिंग व  बावशी-कणकवली येथील गांगेश्‍वर-पावणाई या देवस्वार्‍या तीर्थस्नानास येणार आहेत. तर जिल्हाभरासह पुधे, मुंबई येथील नामवंत 68 भजन मंडळे या यात्रेत आपली भजनकला सादर करणार आहेत.
यात्रा कालावधी तीन दिवसांचा असल्याने गुरुवारी पहाटेपासून समुद्र किनार्‍यावर धार्मिक विधी, देवस्वार्‍यांचे व भाविकांच्या तीर्थस्नानाला सुरुवात होईल. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांना दर्शन घेणे, मंदिर परिसर व समुद्रकिनारी जाणे यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत भाविकांना  दर्शन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी खास रांगा उभारण्यात आल्या आहेत. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी  यावर्षी देवस्थान ट्रस्टने खास व्यवस्था केली आहे.

भाविकांसाठी पाणपोई व स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून नेटके नियोजन करण्यात आले आहे.  यात्रेसाठी  रस्त्याच्या दुतर्फा तसेच समुद्र किनार्‍यावर विविध दुकाने थाटलेली दिसून येत आहेत. देवस्थान ट्र्स्ट, तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक व्यापार्‍यांना दुकानाच्या सीमा ठरवून देण्यात आल्या आहेत.