Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Konkan › कार दरीत कोसळून शिक्षिका गंभीर

कार दरीत कोसळून शिक्षिका गंभीर

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:28PMदेवगड : प्रतिनिधी

कुणकेश्‍वर-देवगड सागरी महामार्गावर तारामुंबरी पुलाच्या नजीक कुणकेश्‍वरहून येणार्‍या इको कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला सुमारे 15 फूट खोल घसरत झाडाला धडकली. या अपघातात सौ. सई सुनील चव्हाण (34, रा. जामसंडे) या महिलेस गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी 3 वा.झाला.

देवगड इंग्लिश मिडीयम स्कूलमधील शिक्षिका सौ. सई चव्हाण या दुपारी 2 वा. शाळा सुटल्यानंतर पतीसमवेत कारने कुणकेश्‍वर येथे गेल्या होत्या. कुणकेश्‍वरहून जामसंडे येथील घरी येत असताना तारामुंबरी पुलानजीक सुनील चव्हाण यांचा गाडीवरील ताबा सुटला व कार तारामुंबरी पूल लगत डाव्या बाजूला खोल दरीत कोसळून झाडाला जाऊन आदळली. 

यात  सौ. सई चव्हाण यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक ग्रामस्थ तसेच आनंद कुलकर्णी, मिलिंद मोर्ये, प्रसाद कुलकर्णी, आनंद रामाणे आदींनी देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून 108 रूग्णवाहिकेने कणकवली येथे अधिक उपचारांसाठी पाठविण्यात आले. कारचालक सुनील चव्हाण यांना किरकोळ दुखापत झाली. कार सुदैवाने झाडाला आदळली, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. 

या अपघाताची नोंद उशिरापर्यंत देवगड पोलिस ठाण्यात झाली नव्हती.