Fri, May 24, 2019 02:33होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजला वर्षभरात मान्यता

सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजला वर्षभरात मान्यता

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:03PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुसज्ज असे मेडिकल कॉलेज होणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक या सर्वांची इच्छा असून प्रयत्नही आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात जिल्ह्यातील आरोग्याच्या इतर प्रश्‍नासह मेडिकल कॉलेज मान्यतेचा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

दरम्यान, डॉक्टरांना 80 हजार ते 1 लाख रु. पर्यंत पगार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. वालावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. आशा स्वयंसेविका सौ. शारदा खानोलकर यांना ना. सावंत यांनी फीत कापण्याचा मान दिला. आ. वैभव नाईक, सभापती राजन जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चाकोरकर, तालुकाध्यक्ष राजन नाईक, गटनेते नागेंद्र परब, जि.प. सदस्य वर्षा कुडाळकर, अमरसेन सावंत, पं. स. सदस्य सौ. माधवी प्रभू, सरपंच शेखर  गावडे, अतुल बंगे, डॉ. योगेश साळेल, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहायक आरोग्य अधिकारी व्ही. डी. नांदरेकर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी बी. एम. काळेल, आयुष वैद्यकीय अधिकारी एच. एस. शिंगरे आदी उपस्थित होते.

ना. सावंत म्हणाले, आ. वैभव नाईक हे जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सभागृहात, रस्त्यावर आणि माझ्याशी भांडत असतात. खरंतर सर्व आरोग्य केंद्रे चांगली व्हावीत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. म्हणूनच जिल्ह्यात यापूर्वी काम केलेल्या डॉ. बिलोलीकर यांना खास सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्यासाठी माझ्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. 

एनएचएम कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नाबाबत आ. नाईक कायमच लक्ष वेधत असतात. मध्यंतरी आचारसंहितेमुळे हा प्रश्‍न मार्गी लागला नाही. मात्र, आता अधिवेशनानंतर याबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल, याकरिता तीन 
मंत्र्यांची  कमिटी नेमण्यात आली आहे. ती कमिटी  निर्णय घेईल. हा  प्रश्‍न मार्गी  लागला की, वर्ग तीनच्या पदाकरिता परीक्षा  घेतली जाईल. कुडाळ येथे महिला बाल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. त्या रुग्णालयाकरिता 20 कोटी रू. वर्ग करून  ठेवण्यात  आले आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता आहे. ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. जिल्हा परिषदेनेही आरोग्य विभागाला डॉक्टरांची उपलब्धता करून दिल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत.  आज जिल्ह्यात एमबीबीएस  डॉक्टरांची गरज आहे. त्याकरिता पालकमंत्री ना. केसरकर यांच्याशी चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील मायनिंगच्या फंडातून विशेष निधी उपलब्ध करून त्यातून त्या डॉक्टरांना 80 ते 1 लाख रू. पर्यंत पगार देण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

आ. वैभव नाईक  म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्याचे अनेक प्रश्‍न  आहेत. सध्या जिल्ह्यातील एनएचएमच्या हंगामी कर्मचार्‍यांना कायम करण्यासाठी प्रयत्न करावेत. कुडाळमधील महिला रूग्णालय लवकरच सुरू व्हावे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिध्दीविनायक ट्रस्टकडून डायलेसिस सेंटरसाठी  निधी मिळाला असून ते सेंटर  आठ दिवसात कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा  व्यक्त करत  डॉक्टर सेवा पूर्ण करण्यावर भर द्यावा, अशी मागणी केली.उद्घाटन कार्यक्रमात काहीजण राजकारण करत आहेत पण आरोग्याच्या सुविधेबाबतच्या त्रुटींची आम्हाला जाण आहे. आरोग्याच्या प्रश्‍नी राजकारण न करता त्या सोडविण्यासाठी आम्ही क्रेडीट न घेता काम करत आहोत. दोन वर्षांपूर्वी या इमारतीला निधी मंजूर झाला, कामही पूर्ण झाले होते. त्यामुळे निधी कुणी आणला आणि कोण क्रेडिट घेते हा प्रश्‍न नसल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगत उद्घाटन करणार्‍या स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांवर निशाणा साधला.प्रास्ताविक डॉ. महेश  खलिपे त्यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. काळेल यांनी केले.