Mon, Jun 24, 2019 20:58होमपेज › Konkan › कुडाळ तहसील आवारातील वाळू डंपर पळविला

कुडाळ तहसील आवारातील वाळू डंपर पळविला

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:11PMकुडाळ : प्रतिनिधी

मायनिंग अधिकार्‍यांनी जप्त केलेला अवैध वाळू वाहतूक करीत असलेला  डंपर कुडाळ तहसील आवारातून शुक्रवारी सकाळी 8 वा.च्या सुमारास कुणीतरी पळवून नेला. याबाबत कुडाळ महसूल यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून रात्रपाळीवर असलेल्या तलाठी नवीन राठोड व आंदुर्ले कोतवाल भाई मोरे यांनी झाला प्रकार तहसीलदार अजय घोळवे यांच्या कानावर घातला. तहसील आवारातील ट्रक पळवून नेणे हा येथील पहिलाच प्रकार असून याबाबत चौकशी सुरू असल्याचे तहसीलदार अजय घोळवे यांनी सागितले. 

मायनिंग अधिकारी अमर देवेकर गुरूवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरुन मार्गस्थ होत होते. याचवेळी कुडाळहून गोव्याच्या दिशेने भरधाव जाणारा अवैध वाळू भरलेला डंपर त्यांच्या दृष्टीस  पडला. त्यांनी तत्काळ डंपर थांबवून याबाबतची माहिती कुडाळ तहसीलदार अजय घोळवे यांना  फोनवरून दिली. श्री. घोळवे यांनी तलाठी एस.एस.गुजर,एम.व्ही काटे व नवीन राठोड यांना वाळूचा डंपर ताब्यात घेण्यासाठी पाठवून दिले. कुडाळ  तहसीलच्या या पथकाने मायनिंग अधिकार्‍यांनी थांबविलेला डंपर ताब्यात घेत गुरूवारी रात्री 10.30 वा.च्या सुमारास कुडाळ तहसील आवारात आणून लावला. तलाठ्यांनी त्या वाळूच्या डंपरचा पंचनामा केला. मात्र चालकाने त्या पंचनाम्यावर सही करण्यास नकार दिला. दरम्यान शुक्रवारी सकाळी 8 वा.च्या सुमारास कुडाळ तहसील आवारातून अचानक तो डंपर कुणीतरी पळवून नेला. यावेळी तलाठी व एक शिपाई कार्यालयात उपस्थित होते. अखेर याबाबतची माहिती उपस्थित तलाठी नवीन राठोड व कोतवाल भाई मोरे यांनी तहसीलदार घोळवे यांना दिली. या प्रकाराने तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र शुक्रवारी सांयकाळी उशिरापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार पोलिस स्थानकात दिली नव्हती. याबाबत मायनिंग अधिकारी अमर देवेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होवू शकला नाही.