Mon, Aug 19, 2019 13:22होमपेज › Konkan › सिंधुदुर्गातील डॉक्टरांकडून पंतप्रधानांच्या वक्त्व्याचा निषेध

सिंधुदुर्गातील डॉक्टरांकडून पंतप्रधानांच्या वक्त्व्याचा निषेध

Published On: Apr 27 2018 10:26PM | Last Updated: Apr 27 2018 10:26PMकुडाळ : वार्ताहर

लंडनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय डॉक्टरांविषयी काढलेल्या अनुद्गाराचा सिंधुदुर्गातील ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी धिक्कार करत  निषेध म्हणून काळ्या फिती बांधून काम केले, अशी माहिती संघटनेचे सचिव डॉ. संजय केसरे यांनी दिली. 

आयएमए कुडाळ, सावंतवाडी, शिरोडा, वेंगुर्ला शाखेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष  डॉ. राजेश्‍वर उबाळे व सचिव  डॉ. संजय केसरे यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पंतप्रधानांच्या वक्तव्याबाबत चर्चा करण्यात आली.  पंतप्रधानांनी ज्या पद्धतीची टीका केली तिचे स्वरूप आणि त्यासाठी वापरलेली भाषा जगातल्या सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास निश्‍चितच शोभनीय नाही.  पंतप्रधानांची अशी केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केलेली ही शेरेबाजी प्रामाणिक डॉक्टरांसाठी मानहानीकारक तर आहेच त्याचबरोबर डॉक्टर-रुग्ण सुसंवादासाठी अडसर ठरणारी असल्याचा आरोप आयएमएचे  सचिव डॉ. संजय केसरे यांनी केला. भारतीय डॉक्टर हे त्यांच्या कौशल्याबद्दल जगभर नावाजले जातात. फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, इंग्लंड यासारख्या सर्व जगात त्यांचा आजवर अनेकदा गौरव झालेला आहे. म्हणून भारतीय वैद्यकीय जगताची प्रतिमा मलीन करणारी भाषा परकीय भूमीवर वापरणे प्रधानमंत्र्यांकडून अजिबात अपेक्षित नाही. आयएमएने धनदांडग्यांचे चोचले पुरवणार्‍या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाचा  तीव्र विरोध केल्यामुळे ही भाषा आली नाही ना? आयएमएने जेनेरिक औषधांचा नेहमीच आग्रह धरलेला आहे. एक कंपनी एक औषध आणि एक आणि एकच किंमत यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत, परंतु सरकारने त्याला दाद दिलेली नाही. स्टेंटच्या किंमती नियंत्रणात ठेवणे आणि रुग्णाला स्टेंट निवडण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील आहोत. 

या सर्वसाधारण सभेसाठी एकूण 25 डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. डॉ.संजय केसरे कुडाळ यांना प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच या सभेमध्ये लोकोपयोगी, समाजोपयोगी असे कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील शाळकरी मुलींमधील अ‍ॅनिमिया विषयी निदान उपचार व संशोधन हा महत्त्वाचा कार्यक्रम राबविणेत येणार असल्याचे डॉ. संजय केसरे यांनी सांगितले. 

या सभेसाठी डॉ.रवींद्र जोशी,डॉ संजय निगुडकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. अमूल पावसकर, डॉ. विवेक पाटणकर, डॉ. शिवशरण, डॉ. मंचेकर, डॉ. सुधीर रेडकर, डॉ. विठ्ठल देसाई, डॉ. आकेरकर, डॉ. संजय सावंत, डॉ. नंदन सामंत, डॉ.श्रृती सामंत, डॉ. रावराणे,डॉ. चुबे, डॉ. मकरंद परुळेकर, डॉ. पंडित, डॉ.वजराटकर, डॉ. नवांगुळ, डॉ. जयश्री केसरे, डॉ. सुभाष राऊळ,डॉ. दिलीप मोडक, डॉ. गोसावी आदी उपस्थित होते.