Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Konkan › महामार्गावरील चिखलात रूतली विद्यार्थिनी!

महामार्गावरील चिखलात रूतली विद्यार्थिनी!

Published On: Aug 15 2018 1:24AM | Last Updated: Aug 14 2018 11:28PMकुडाळ : प्रतिनिधी

साळगाव शिवाजी विद्यालयासमोर महामार्ग चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात येणार्‍या बॉक्सवेलच्या ठिकाणी साठलेल्या चिखलात चक्क एक विद्यार्थिनी रूतली. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्याने रिक्षाचालक अशोक बांबार्डेकर व अजित साळगावकर यांनी धाव घेत तिला चिखलातून बाहेर काढले. दर्शना राजाराम नाईक असे तिचे नाव आहे. मात्र, या प्रकारामुळे चौपदरीकरण ठेकेदार कंपनीचा बेजबाबदार कारभारच समोर आला आहे आणि याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

 झाराप तिठ्यानजीक साळगाव विद्यालयाजवळ बॉक्सवेलचे काम सुरू आहे. या ठिकाणी ठेकेदार कंपनीने पर्यायी रस्ता तयार करून डांबरीकरण केले आहे. गेले चार दिवस पावसाने उघडीप घेतल्यामुळे ठेकेदार कंपनीने बांधकामासाठी खोदाई केलेल्या खड्ड्यातील चिखल सक्शन मशीनच्या साहाय्याने बाहेर काढला होता. हा चिखल पर्यायी रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला आहे. हाच रस्ता साळगाव विद्यालयातील मुलांसाठी जवळचा ठरत असल्यामुळे विद्यार्थी या रस्त्याचा वापर करतात. मंगळवारी सकाळी 9 वा.च्या सुमारास नेहमीप्रमाणे कु. दर्शना नाईक ही विद्यालयात जात होती. अनावधानाने चिखल सदृश्य मातीवरून तिचा पाय घसरला व ती चिखलात पडली. त्यातून उठण्याचा प्रयत्न करताना ती चिखलात अधिकाधिक रूतू लागली. यावेळी तिने जीवाच्या आकांताने आरडा-ओरड केली. सुदैवाने त्याच वेळी रस्त्यावरून जाणार्‍या एका महिलेने झाराप येथील रिक्षा चालकांना याची कल्पना दिली.   रिक्षा चालक अशोक बांबार्डेकर, अजित साळगांवकर, बाबी हळदणकर व गजानन हळदणकर यांनी घटनास्थळी धाव घेत त्या युवतीला चिखलातून बाहेर काढले. प्रचंड भयभीत झालेल्या या युवतीला रिक्षा चालकांनी घरी पोहोचविले. केले. केवळ दैव बलवत्तर म्हणून ही युवती या जीवघेण्या प्रसंगातून वाचली.