Sun, Sep 23, 2018 15:44होमपेज › Konkan › कोकण रेल्वेत डल्ला मारणारे तीन चोरटे नांदेडमध्ये जेरबंद

कोकण रेल्वेत डल्ला मारणारे तीन चोरटे नांदेडमध्ये जेरबंद

Published On: Aug 29 2018 1:29AM | Last Updated: Aug 28 2018 11:12PMकुडाळ : वार्ताहर

जुन-जुलै महिन्यात कोकण रेल्वे मार्गावर मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये चोर्‍या करणार्‍या तीन चोरट्यांना पकडण्यात अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने यश मिळवले आहे. या तिघांनाही नांदेड येथून पकडण्यात आले असून, या तीन चोरट्यांनी जून -जुलैमध्ये कोकण रेल्वेत झालेल्या चार चोर्‍यांची कबुली दिली आहे. कुडाळ न्यायालयाने या तिघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोकण रेल्वेमार्गावर 16 जून 2018 रोजी प्रमोदकुमार राम (40 रा. कर्नाटक) यांची 4 हजार रोख रक्कम, 14 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, आधारकार्ड असा मुद्देमाल चोरीस गेला होता. या चोरीची फिर्याद नोंदवल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना मत्स्यगंधा एक्स्प्रेस या रेल्वेत कुडाळ हद्दीत घडली होती. यानुसार हा गुन्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपासासाठी सोपविण्यात आला होता. या विभागाने या चोरट्यांचा शोध घेत प्रकाश अश्रुबा नागरगोजे (21, रा. बीड), तान्हाजी शिवाजी शिंदे (21, हिंगोली), महेश चाळू किल्लेदार (23, आजरा, कोल्हापूर) या तिघांना नांदेड येथून पकडण्यात यश मिळवले आहे. या तीनही चोरट्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. याचदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये झालेल्या आणखी तीन चोर्‍यांचीही कबुलीही या चोरट्यांनी  दिली आहे. या चारही चोर्‍यांमध्ये सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. यात सोन्याच्या दागिन्यांचा, मोबाईल यांचा समावेश होता. चोरलेल्या मुद्देमालापैकी दोन मोबाईल पोलिसांना हस्तगत करता आले आहेत. मात्र चोरलेले दागिने सोनाराला विकल्याचे या चोरट्यांकडून सांगण्यात येत आहे. यासाठी कुडाळ पोलिसांचे पथक नांदेडमध्ये लवकरच जाण्याची शक्यता आहे. यातील प्रकाश नागरगोजे याच्या विरोधात औरंगाबाद येथेही गुन्हा दाखल असून त्याला त्याठिकाणीही अटक करण्यात आली होती. या तिघांनाही कुडाळ न्यायालयाने हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास कुुडाळ पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस ज्योती दुधवडकर करत आहेत.