Mon, Apr 22, 2019 23:57होमपेज › Konkan › रेल्वेत चोरट्यांचा धुडगूस सुरूच

रेल्वेत चोरट्यांचा धुडगूस सुरूच

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 9:58PMकुडाळ : वार्ताहर

बुधवारी रात्री मत्स्यगंधा एक्स्प्रेस व रत्नागिरी पँसेंजरमधील प्रवाशांना लुबाडल्याच्या घटना ताज्या असतानाच दुसर्‍या दिवशी तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या एका दांपत्याचे दागिने व रोख रक्कमेसह सुमारे 97 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सलग दोन दिवस झालेल्या या प्रकारांनी रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  ही घटना गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी पहाटे 5 वा.च्या सुमारास घडली. याबाबत सौ. संध्या शंकर पिळणकर (कुर्ला-मुंबई) यांनी कुडाळ पोलिसात तक्रार दिली आहे. 

मुंबई-कुर्ला येथील सौ. संध्या पिळणकर ही महिला आपल्या पतीसह कुडाळ येथे भाचीच्या लग्न कार्यासाठी येत होती. दादर रेल्वे स्थानकात गुरूवारी सायं. 5 वा.हे दांपत्य रेल्वेत बसले. प्रवासादरम्यान त्यांनी आपले सर्व सामान सीटच्या खाली ठेवले होते. या सामानाच्या पिशवीमध्ये मोती रंगाची पर्स ठेवली होती.  रात्री पनवेल येथे दोघेही झोपी गेले. पहाटे 5 वा. च्या सुमारास गाडी चिपळूण स्थानकात  आल्यावर तिने आपले सामान व पर्सची तपासणी केली. यावेळी तिला आपल्या सामानाची पिशवी उघडी दिसली व त्यातील पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. प्रवासादरम्यान पनवेल येथून एक 45 ते 50 वर्षांचा टक्कल असलेला इसम सीटच्यामध्ये झोपला होता. गाडी चिपळूण येथे आल्यावर इसम त्या ठिकाणी नव्हता. चोरीस गेलेल्या पर्समध्ये 70 हजार रू. किंमतीचे दुपदरी मंगळसूत्र, 15 हजारांचे 8 ग्रँमचे कानातील कुडी जोड, 5 हजारांचा मोबाईल व 7 हजार रू. रोख रक्कम होती. या चोरट्याने या सर्व मुद्देमालासह पर्स चोरून नेली. याप्रकरणी कुडाळ पोलिस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास कुडाळ पोलिस करत आहेत.