Thu, Jul 18, 2019 00:38



होमपेज › Konkan › रस्ता दुरुस्तीवरुन सत्ताधारी विरोधकात हमरी-तुमरी 

रस्ता दुरुस्तीवरुन सत्ताधारी विरोधकात हमरी-तुमरी 

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 07 2017 10:07PM

बुकमार्क करा





कुडाळ : प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील मुख्य रस्ता दुरूस्तीप्रश्‍नी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यासोबत विरोध नगरसेवकाची चांगलीच शाब्दीक खडाजंगी होऊन विषय   हमरी-तुमरीपर्यंत गेला. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवक राकेश कांदे यांनी  मुख्याधिकार्‍यांनाच टार्गेट करत तुमच्यामुळे कुडाळ नगरपंचायत बदनाम होत असल्याचा आरोप करत घरचा आहेर दिला. 

कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी झाली.  उपनगराध्यक्ष आबा धडाम, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे आदींसह सभागृहत नगरसेवक उपस्थित होते. शहरातील रस्त्याच्या दुरूस्तीचा  विषय येताच हा रस्ता कुणाच्या ताब्यात आहे? असा सवाल   सचिन काळप यांनी केला. मुख्याधिकारी ढेकळे यांनी 2 डिसेंबरला हा रस्ता नगरपालिकेने ताब्यात घेतला, पण अद्यापही सिमांकन व मोजणी नकाशा बांधकाम विभागाने दिलेला नाही असे सांगितले.  नगराध्यक्षांनी नगरसेवकांशी चर्चा करून हा रस्ता ताब्यात घेतल्याची चर्चा होताच त्या बैठकीला आम्हाला बोलविले नाही, सत्ताधारी नगरसेवकही नव्हते असे विरोधकांनी ठणकावून सांगत  नगराध्यक्षांना टार्गेट केले. अनेक महिने आम्ही सभागृहात रस्ता दुरूस्त करा अशी मागणी करत आलो पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता  रिक्षा संघटना व कुडाळ फोरम यांनी आवाज उठविताच आपण तात्काळ रस्ता ताब्यात घेतला आणि 24 तासात निविदा यादीची कामेही सुरू केलात. रस्ता दुरूस्ती कामे सुरू केलात ही स्वागतार्ह बाब आहे. पण पध्दत चुकीची आहे. अशा पध्दतीने  रस्ता ताब्यात घेणे ही न. पं. साठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगत सौ. प्रज्ञा राणे यांनी हा रस्ता ताब्यात घेण्यास आपला आजही विरोध असल्याचे सांगितले. एकाच रस्त्याला पैसे खर्च केलात, शहरातील अन्य रस्त्यांची दुरूस्ती कुठून करणार? असा सवालही त्यांनी केला. 

ऐजाज नाईक व सौ. उषा आठले यांनीही रस्ता ताब्यात घेण्यास विरोध होता असे सांगितले. एजाज नाईक यांनी तर या रस्त्यावर प्रतिवर्षी1 कोटी 80 ला  रूपयाचा खर्च  अपेक्षित आहे, तो कुठून करणार? असा सवाल केला.  नगराध्यक्ष राणे यांनी आमचे दोन सदस्य नियोजन समितीवर आहेत. त्यांचा निधी खर्च घालू असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी गणेश भोगटे, राकेश कांदे यांनी मुख्याधिकार्‍यांना धारेवर धरत मुख्याधिकारी सभागृहात  एक व नगराध्यक्ष एक असे सांगत असल्याचा आरोप केला. भोगटे यांची नगराध्यक्ष राणे  यांच्याशी शाब्दीक खडाजंगी झाली. नगराध्यक्षांनी रस्त्याचे काम मॅनेज केले असा गंभीर आरोप करत आम्ही विश्‍वस्त आहोत तुम्हा मालकांसारखे बोलू नका असे खडेबोल नगराध्यक्षांना सुनावले. अखेर शहरातील रस्ता हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने दुरूस्तीचे काम सुरूच ठेवा असे विरोधी गटाकडून सौ. आठले यांनी सांगितल्यावर वादावर पडदा पडला.