Fri, May 24, 2019 02:25होमपेज › Konkan › दोन वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट

दोन वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:02PM

बुकमार्क करा


कुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेआठशे कोटी रूपयाची कामे सुरू असून  येत्या दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांचा कायापालट झालेला दिसेल,असा विश्‍वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेली कामे यापुढे कोणत्याही परिस्थितीत पोट ठेकेदारामार्फत चालणार नाहीत. एकाच मौसमात माती व डांबरीकरणाची कामे झाली पाहिजे,अशा सक्त सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचेही सांगितले.

कुडाळ येथील हॉटेल राज समोरील रेस्ट हाऊसवर  रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. केसरकर बोलत होते.आ.वैभव नाईक, सभापती राजन जाधव, जि.प.सदस्य संजय पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब आदी उपस्थित होते. 

ना. केसरकर म्हणाले, मुंबई-गोवा हायवेचे काम जोराने सुरू असतानाच इतर रस्त्यांचीही कामे प्राधान्याने हाती घेण्यात  आली आहेत. बेळगांव-कोल्हापूर जोडणारा सावंतवाडी रस्ता वैभववाडी ते कणकवली, संकेश्‍वर ते रेडी, बेळगांव ते वेंगुर्ला, कणकवली ते आचरा व कसाल ते मालवण या रस्त्यांची कामे हाती घेतली असून यासाठी 8 50 कोटी रु.चा निधी आहे. वेंगुर्ला दाणोली रस्त्याला स्थानिक लोकांनी सहकार्य केल्यास तो रस्ताही प्राधान्याने हाती घेतला जाईल,असे सांगितले. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना हायवे दुतर्फा 40 हजार झाडे तुटत असली तरी सावंतवाडी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी ग्रामपंचायतींची मदत घेवून 2 लाख झाडे लावण्याची व्यवस्था केली आहे.  आवश्यकता वाटल्यास  शासनाकडून रोपे पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. स्वतःच्या जमिनीवर राखीव वन लागल्यामुळे जमिनी विकणे अडचणीचे होते. मात्र, आता ती अडचण शेतकर्‍यांना येणार नाही. शासनाने अलिकडेच याबाबत नवीन परिपत्रक काढले असून त्यामध्ये वन अशी नोंद असली तरी शेतकर्‍यांना ती जमीन विकता येणार आहे. खासगी वनात एमआरजीएस योजनेतंर्गत लागवड व्हावी यासाठी आ. वैभव नाईक यांनी विधानसभेत आवाज उठवला होता.त्यावर लवकरच समाधानकारक शासनाचा निर्णय होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. भात पीक खरेदी प्रश्‍नी येत्या आठवड्यात पुरवठा मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुडाळ येथे बजाज राईस मिल कार्यरत झाली आहे.  मात्र, शासनापेक्षा भाताला अधिक दर देणे काहीसेे अडचणीचे असले तरी यावर लवकरच मार्ग काढला जाईल,असे ना.केसरकर यांनी सांगितले. ओखी वादळाच्या नुकसानीत काजूचे नुकसान गृहित धरले होते पण कॅबिनेटच्या बैठकीत आंबा पिकाचाही समावेश घेण्याचा  निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.