Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Konkan › बेपत्ता युवकाचा जंगलात मृतदेह

बेपत्ता युवकाचा जंगलात मृतदेह

Published On: Jul 21 2018 10:45PM | Last Updated: Jul 21 2018 10:18PMकुडाळ : वार्ताहर

नेरूर-वाघोसेवाडी येथील ओंकार अशोक परब (वय 24) या बेपत्ता झालेल्या युवकाचा हाडांचा सापळा तब्बल सव्वा महिन्यानंतर वाघोसेवाडी चिरेखाण परिसरात सापडला. त्याच्या घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावरच हा सापळा सापडला. सापळ्यानजीक एक नायलॉनची दोरी सापडली आहे. यावरून ही आत्महत्या असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. 

रानभाजी प्रदर्शनासाठी रानभाजी शोधण्यासाठी गेलेल्या तेथीलच एका युवकाला चपला व नंतर हा सापळा आढळून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बेपत्ता झाल्यानंतर गेले सव्वा महिने त्याचा आटोकाट शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

12 जून रोजी दु.3.30 वा. ओंकार परब हा आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. याच दिवशी तो दुपारी येथील विजय श्रृंगारे यांच्या घराकडून जाताना आढळला होता. मात्र, यानंतर तो सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने 13 जून रोजी वडील अशोक परब यांनी अशी फिर्याद पोलिस स्थानकात नोंदवली होती. यानंतर सतत पाच ते सहा दिवस शेजारी, मित्र परिवार यांनी शोध घेतला होता. ज्या जंगलात शनिवारी हा हाडांचा सापळा सापडला ते जंगलही सतत पाच दिवस दिवस-रात्र एक करून पिंजून काढले होते. मात्र तरीही ओंकार याचा कोणताच सुगावा लागला नव्हता. दरम्यान, यानंतर दोन दिवसात आंदुर्ले येथे ओंकार दिसल्याची माहिती मिळाल्यावर तेथेही जावून त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, त्याच्याबद्दल कोणतीच माहिती मिळाली नव्हती. ओंकार हा परत सुखरूप येईल या आशेवरच गेले सव्वा महिने त्याचे कुटुंबीय जीवन जगत होते. अखेर सव्वा महिन्यानंतर त्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच जंगलात त्याचा सापळा मिळाल्याची माहिती घरच्यांना मिळताच वडिलांसह घरच्याचा अश्रूंचा बांधच फुटला.

तेथीलच एक युवक रविवारी सावंतवाडी येथील रानभाजी प्रदर्शनात ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या रानभाज्या शोधण्यासाठी याच जंगलात फिरत होता. याच दरम्यान त्याला रानभाजी म्हणून वापरला जाणारा कणक बांबूचा मोठा  कोंब आढळल्याने तो  पुढे गेला. यावेळी त्याला त्याच वाटेवर एक नवीन चप्पल जोड आढळले. नवीन चप्पल जंगलात आढळल्याने त्याने त्याच ठिकाणी निरखून पाहिल्यावर एक कवठी व हाता-पायाची हाडे विखुरलेल्या स्थितीत आढळून आली. या हाडांवर जीन्स पॅन्ट व टीशर्ट असल्याचेही त्याला दिसले. त्याला हा एक मानवी मृतदेहाचा सापळा असल्याचे लक्षात आल्यावर त्याबाबत शेजारील व्यक्तींना कळवले. खात्री केल्यावर चप्पल व कपड्यांच्या वर्णनावरून हा मृतदेह बेपत्ता झालेल्या ओंकार परबचा असल्याचे समजले.त्याचा चुलत भाऊ चंद्रशेखर परब याने त्याची ओळख पटवली. मृतदेहाशेजारी एक रेनकोट व एक नायलॉन दोरी आढळली. दोरीच्या एका बाजूला गाठ असल्याने या दोरीने गळफास लावून केलेली आत्महत्या असल्याचा अंदाज घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, घटनास्थळावर ज्या ठिकाणी  ओंकारचा मृतदेह आढळला त्याच्यावर मजबूत अशी गळफास घेण्यासारखी झाडाची कोणतीच फांदी आढळली नाही. त्यामुळे या ठिकाणी आत्महत्या कशी केली असावी?असा प्रश्‍न घटनास्थळावरील स्थितीवरून व्यक्त होत असून ही स्थिती काहीशी संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यामुळे ओंकारच्या मृत्यूमागे आत्महत्या हेच कारण आहे की अन्य काही याबाबत घटना स्थळावर संशयही व्यक्त होत आहे. तसेच ओंकार हा साधा युवक असून त्याचे तसे कोणाशी वैर अथवा वाद असणे कठीण असल्याची चर्चा घटनास्थळावर सुरू होती.

त्यांच्या घरापासून दोनशे मीटरवर त्याचा मृतदेह असूनही त्याबाबत कोणालाच काही माहिती मिळाली नाही.तसेच पाच  दिवस हे जंगल पिंजूनही त्याचा मृतदेह त्यावेळी गळफास लावलेल्या स्थितीत कोणालाच आढळला नाही. यामुळे ही घटना चार ते पाच दिवसानंतर घडली असावी, असाही संशय व्यक्त होत आहे. घटनास्थळाचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील, पोलिस डिसोजा महिला पोलिस सौ. दुधवडकर यांनी केला. या घटनेची फिर्याद त्याचा चुलत भाऊ चंद्रशेखर परब याने कुडाळ पोलिसात दिली आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील, चार बहिणी असा परिवार आहे.