होमपेज › Konkan › लोकसभा-विधानसभा स्वबळावरच!

लोकसभा-विधानसभा स्वबळावरच!

Published On: Feb 04 2018 11:24PM | Last Updated: Feb 04 2018 10:22PMकुडाळ : शहर वार्ताहर

लोकसभा -विधानसभा निवडणुका स्वबळावर लढून संपूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच  कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पक्ष मेळाव्यात केले. जैतापूर अणुऊर्जा व रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचे ठणकावून सांगत ना. देसाई यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले.  
सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा जिल्हा मेळावा रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी  हॉल येथे पार पडला. पालकमंत्री दीपक केसरकर, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, जिल्हाप्रमुख  आ. वैभव नाईक, सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया पब, जि.प.सदस्य नागेंद्र परब, संजय पडते, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, राजू कविटकर, मायकल डिसोजा, श्री. खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अ‍ॅड. हर्षद गावडे, भाई गोवेकर, रूपेश राऊळ, राजु नाईक, संतोष शिरसाट, नितीन वाळके, सौ. शिल्पा घुर्ये, बाबुराव धुरी आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी, जि.प. व पं.स. सदस्य, नगरसेवक, सरपंच व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, भाजपने जनतेचा भ्रमनिरास केला असून संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेना हवी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले, आतातर त्या पेक्षाही चांगली परिस्थिती शिवसेेनेसाठी आहे. यामुळे 2019 च्या निवडणुकीत सेनेच 150 आमदार निश्‍चितच निवडून येतील, असा विश्‍वास त्यांनी व्शक्त केला. 
 ना.देसाई म्हणाले,  उद्धव ठाकरे हे सेनेचे प्रखरपणे नेतृत्व करीत आहेत. तर संपूर्ण हिंदुस्थानात आदित्य ठाकरेंनी वेगळी छाप पाडली आहे. पुढील काळात तरूणांची संघटना म्हणून सेना प्रभावीपणे काम करणार आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ही निष्ठावंत सेना  असून सेनेचा टॉप गिअर  पडला आहे तर जिल्ह्यात काहींचा गिअर रिव्हर्स पडला आहे. सेना प्रमुखांचा नारायण राणेंनी केलेला अपमान आम्ही कदापी सहन करणार  नाही. 

न्याय हक्कासाठी सेना लढत आहे. स्थानिक मच्छिमारांच्या बाजूने सेना असून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल. एलईडी दिवे लावून केली जाणारी मच्छिमारी बेकायदेशीर असून ती बंद झाली पाहिजे यासाठी कोकणातील सर्व आमदार आग्रही असून त्यावर बंदी घालून स्थानिक मच्छिमारांना न्याय मिळवून देऊ असे सांगितले. जिल्ह्यातील सर्व नेमणुका पूर्ण करून पक्ष संघटना वाढीसाठी प्रत्येकाने कामाला लागावे. याबाबत दर पंधरा दिवसांनी आपण संबंधितांकडून आढावा घेणार असल्याचे ना. देसाई यांनी सांगितले. 
संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर म्हणाले, शिवसेना कार्यकर्ते आता अरे ला कारे  म्हणण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेनेची शाखा हीच मंत्रालय आहे त्यामुळे शिवसेनेच्या अंगावर येण्याची कुणी हिंमत करू नये असे सांगितले.  आ. नाईक म्हणाले, शिवसेनेची वाटचाल ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर आहे. सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम शिवसेना करीतआहे. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये काही जण घराणेशाहीमुळे  तर भाजपमध्ये काहीजण लाटेवर आमदार झाले असल्याचे सांगितले.