होमपेज › Konkan › कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

कोकण रेल्वे मार्गावर चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:46PMकुडाळ : वार्ताहर

कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ ते वैभववाडीदरम्यान 2 ते 4 तासात चोरट्यांनी चार प्रवाशांकडून सुमारे 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रकमेचा समावेश आहे. 
मेंगलोर येथील सुमन्ना वासुदेवा हे मेंगलोर येथून मुंबई येथे मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होते. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास त्यांच्याकडील 11 हजार रु. किमतीचा मोबाईल व 9 हजार रु. रोख रक्कम चोरट्यांनी घेतली. दुसर्‍या घटनेत कुर्ला येथील लक्ष्मी विष्ण्ाू गवस ही महिला याच दिवशी मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधूनच प्रवास करत होती. रात्री 2 वा.नंतर त्यांच्या ताब्यातील 2 लाख रु.चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, चेन, अंगठ्या, कानातली कुडी, चांदीची पायल, तसेच 23 हजार रु. रोख रक्कम आदीचा समावेश आहे. ही महिला थिविम-गोवा येथून मुंबई येथे प्रवास करत होती. हरियाणा येथील प्रवीण कुमार हे मडगाव-रत्नागिरी या गाडीने रत्नागिरी येथे प्रवास करत होते. चोरट्यांनी यांच्याकडील 10 हजार रु.चा मोबाईल, एटीएम. तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे चोरली. तर कर्नाटक-कारवार येथील प्रमोदकुमार राम हे मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून याच दिवशी प्रवास करत होते. 

यांच्याकडील सुमारे 45 हजार रू. किंमतीचे 14 ग्रॅम सोने, 4 हजार रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. यामध्ये दोन रेल्वेमध्ये अवघ्या दोन ते चार तासात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरण्यास यश मिळविले. या सर्व चोरी मध्यरात्री प्रवाशी गाढ झोपेत असताना चोरले.  फिर्यादींनी याबाबतची तक्रार रेल्वे पोलिसांकडे नोंदविल्यानंतर रेल्वे पोलिसांनी या तक्रारीत बुधवारी कुडाळ पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे. या सर्व चोरी कुडाळ रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्रवाशांनी फिर्यादीत नमूद केले आहे.