Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Konkan › देशातील पहिले डाटा सेंटर लवकर सिंधुदुर्गात होणार : केसरकर

देशातील पहिले डाटा सेंटर लवकर सिंधुदुर्गात होणार : केसरकर

Published On: Jun 24 2018 4:47PM | Last Updated: Jun 24 2018 4:47PMकुडाळ : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्हा हा हुशार विद्यार्थ्यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थी मोठे अधिकारी बनावेत यासाठी सावंतवाडी येथे एमपीएससी व युपीएससी सेंटर मंजूर करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन (सिंधुस्वाध्याय) केंद्र लवकरच वेंगुर्लेत होणार आहे. शिवाय देशातील पहिले आधुनिक स्वरूपाचे आयटी सेंटर (डाटा सेंटर) सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात निर्माण होणा-या शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन खुप शिकावे, मोठे व्हावे आणि जिल्हा, राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.दिपक केसरकर यांनी कुडाळ येथे केले.

शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक व कुडाळ तालुका शिवसेना आयोजित कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडला. या प्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते. याप्रसंगी खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक, तालुकाप्रमुख राजन नाईक, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, जि.प.सदस्य संजय पडते, नागेंद्र परब, अमरसेन सावंत, वर्षा कुडाळकर, अनुप्रिती खोबरे, पं.स.सदस्य जयभारत पालव, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, गणेश भोगटे, सचिन काळप, सौ.श्रेया गवंडे,सौ.मेघा सुकी, सौ.प्रज्ञा राणे, माजी उपसभापती बबन बोभाटे, अतुल बंगे, संजय भोगटे, गंगाराम सडवेलकर, संदेश प्रभू, संदीप राऊळ, सौ.स्नेहा दळवी, सुशील चिंदरकर, आदींसह पदाधिकारी - कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

केसरकर यांनी सुरवातीलाच गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता मोठी आहे. या जिल्ह्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, तहसीलदार अशा मोठ मोठ्या पदावर पोहोचावेत यादृष्टीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सावंतवाडी येथे एमपीएससी व युपीएससी सेंटर मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक तालुका सेंटर या सेंटरला जोडली जाणार आहेत. झाराप येथे होणा-या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रांत विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सागरी संशोधनासाठी मुंबई विद्यापीठाचे सागरी संशोधन केंद्र लवकरच वेंगुर्ले येथे होणार आहे. याशिवाय देशातील पहिले आधुनिक आयटी सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार असून, मंजूरीची  कार्यवाही सुरू असून, येत्या सहा महिन्यात हे सेंटर कार्यान्वीत होणार आहे. या केंद्रात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आयटी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले जीवन उज्ज्वल करावे. खा.राऊत, आ.नाईक व आपले नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही केसरकर यांनी दिली.

कौशल्य विकास योजना केंद्राला मंजुरी - खा.राऊत

खा.राऊत म्हणाले, शैक्षणिक सुविधांनी युक्त असलेल्या मुंबई - पूणे सारख्या शहरांना शैक्षणिक गुणवत्तेत मागे टाकण्याचे काम सिंधुदुर्ग - रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केले आहे. संस्थाचालकांची मेहनत व शिक्षकांचे विद्यादानाचे प्रामाणिक काम यामुळे विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात करीअर करून या संधीचे सोने करावे. झारापला होणा-या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात विविध कोर्सेस उपलब्ध होणार आहेत. तसेच या जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे केंद्र मंजूर झाले असून लवकर कुडाळ किंवा कसाल येथे हे केंद्र कार्यान्वीत होणार आहे असे खा.राऊत यांनी सांगत आ.नाईक यांचे कार्यक्रम आयोजना बाबत कौतुक केले.

आ.नाईक म्हणाले, विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेऊन दहावी - बारावीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळावी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारावी या हेतूने हा कार्यक्रम गेली चार वर्ष आयोजित केला जातो. अनेक अडचणींवर मात करून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता विविध स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यावा आणि मोठ मोठ्या अधिकारी पदापर्यंत झेप घेत नावलौकिक मिळवावा असे त्यांनी सांगितले. जि.प.सदस्य पडते, परब, तालुकाप्रमुख ,नाईक, महिला आघाडी प्रमुख सावंत, सभापती जाधव, उपसभापती परब, वर्षा कुडाळकर, बंगे यांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शहरी व ग्रामीण भागातील अशा 275 गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन अनंत पाटकर यांनी केले.