होमपेज › Konkan › मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये तीन प्रवाशांना लुबाडले

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये तीन प्रवाशांना लुबाडले

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:28PMकुडाळ : वार्ताहर

मत्स्यगंधा एक्स्प्रेस या कोचीवलीकडे जाणार्‍या रेल्वेमध्ये एकाच वेळी मध्यरात्रीच्या सुमारात तीन प्रवाशांना चोरट्यांनी लुबाडले. यामध्ये दागिने व रोख रकमेसह 2 लाख 51 हजारांचा मुद्देमालावर चोरट्यांनी हस्तगत करत पळ काढला. मत्सगंधा एक्स्प्रेसमध्ये दागिने चोरीचे प्रमाण वाढले आहेत. लाखो रुपयांचे दागिने चोरीस जाण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे प्रवासीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 मंगला आचार्य (रा. बंगळूर) या महिला मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई येथून बंगळूर येथे प्रवास करत होत्या. यावेळी त्यांनी सुमारे 1 लाख 99 हजारांचे सोन्याचे दागिने व 1 हजार रु. रोख रक्कम असा मुद्देमाल आपल्या पर्समध्ये ठेवला होता. ही पर्सच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. रेल्वे कुडाळ येथे आल्यावर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांची पर्सच चोरटा लांबवत कुडाळ स्टेशन येण्यापूवीचे रेल्वेतून पसार झाला. याच रेल्वेतून डोंबिवली येथून मडगाव येथे प्रवास करणार्‍या अभिषेक नायक यांचे 3 मोबाईल, ब्रॅसलेट असलेली पिशवी अशा 40 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. तर कोचीवली येथील सबिता आर. अमिन या महिलेची 10 हजार रू. रोख रक्कम असलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही रेल्वे मुंबईतून सुटल्यावर पनवेल, चिपळूण, रत्नागिरी ते कुडाळ हा दोन तासांचा प्रवास असल्याने व मध्यरात्रीची वेळ असल्याने प्रवासी यावेळी झोप घेत असतात. याचाच फायदा घेवून अज्ञात चोरटे चोरी करतात . या दरम्यान ही रेल्वे क्रॉसिंगसाठी काही ठिकाणी थांबा घेते. हे चोरट्यांना माहीत असल्याने चोरटे या मधल्या स्टेशनवर उतरून फरार होतात. मागील दोन महिन्यांपूर्वीही अशीच एकाच दिवशी तीन चोर्‍या याच रेल्वेत घडल्या होत्या. ही रेल्वे मुंबईतून कोचीवलीपर्यंत प्रवास करते. त्यामुळे लांब पल्ल्याचे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपले दागिने व रोख रक्कम दुसर्‍या बॅगमध्ये ठेवतात. याचाच फायदा चोरटे उठवत डल्ला मारतात. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील या वाढत्या चोर्‍यांच्या विचार करून रेल्वे प्रशासनाने या रेल्वेसाठी विशेष सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.