Sat, Jul 20, 2019 13:33होमपेज › Konkan › चौपदरीकरणाचे काम बंद पाडले

चौपदरीकरणाचे काम बंद पाडले

Published On: Apr 26 2018 11:04PM | Last Updated: Apr 26 2018 11:04PMकुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या कुडाळमधील शिष्टमंडळाच्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेसंबंधी सर्वांचे समाधान करणारा निर्णय न होऊ शकल्याने अखेर आ. वैभव नाईक यांच्यासह कुडाळमधील विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी चौपदरीकरणाचे कुडाळ शहरातील काम गुरुवारी बंद पाडले. जोवर जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा महामार्ग प्राधिकरण सध्या मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता वाहतुकीस योग्य असल्याचा निर्वाळा देत नाहीत, तोवर हे काम पुढे करू देणार नाही, असा इशारा या पदाधिकार्‍यांनी दिला आहे. त्यासाठी 2 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सिंधुदुर्गातील जनतेचे पूर्णतः सहकार्य आहे. मात्र, हा ठेकेदार अयोग्य पद्धतीने वागत आहे. या कामावर कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांचे लक्ष देण्याचे काम नाही का? आम्हाला प्रशासनाने केसच्या धमक्या देऊ नये. आता आंदोलन करणार्‍या सर्वांवर 60-70 केसेस आहेत. अजून हवे तर तुम्ही 50 केसेस घाला. चुकीच्या कामात ठेकेदाराची बाजू घ्याल, तर होणार्‍या परिणामाला प्रशासन म्हणून तुम्हीच जबाबदार राहाल, असा इशारा कुडाळमधील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी पदाधिकार्‍यांनी चौपदरीकरणाच्या कामात परिवर्तीत मार्ग कशा पद्धतीने चुकीचे आहे, हे दाखवण्यासाठी महामार्ग रस्ते विभागाच्या उपअभियंत्यांला कामाच्या ठिकाणी नेले. 

मुंबई-गोवा महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरण कामाच्या ठिकाणी वाहनचालक व प्रवाशांना सुरक्षितता मिळावी. काही अत्यावश्यक ठिकाणी बॉक्सवेल व अंडरपास व्हावा, या मागणीसाठी गुरूवारी जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत नियोजित बैठक ठरली होती. जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथील जुना डिपीडीसी हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी आ. वैभव नाईक,  महामार्ग रस्ते विभागाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर, जिल्हा पोलिस विभागाचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा उपस्थित होते. 
यावेळी उपस्थित सर्व पक्षीयांनी प्रशासनाचे प्रमुख या नात्याने प्रदीप जोशी यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. अखेर या भावनांशी आपण सहमत असल्याचे श्री.जोशी यांनी सांगत उपस्थित उपअभियंता शेडेकर यांना त्रुटींबाबतची माहिती तात्काळ अधीक्षक अभियंत्यांना देण्यात यावी, असे आदेश दिले. तसेच जिल्हाधिकार्‍यांच्याच उपस्थितीत कुडाळमध्ये बैठक झाल्यास योग्य ठरेल,  असे त्यांनी सांगितले. 

माजी आ. राजन तेली, जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, जि.प. सदस्य संजय पडते, भाजप प्रवक्ते काका कुडाळकर, अमरसेन सावंत, अभय शिरसाट, बाळा म्हाडगूत, राजू राऊळ, धीरज परब, राजन नाईक, चारूदत्त देसाई आदीसह सर्व पक्षीय  मंडळी उपस्थित होती. 

जिल्ह्यात वाढत चाललेल्या तापमानामुळे जीवाला थोडासा थंडावा मिळावा, यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठांमधील तसेच रस्तोरस्ती असलेल्या  शीतपेयांच्या दुकानांचा आसरा लोक घेताना दिसू लागले आहेत.असह्य तापमानामुळे दुपारी रस्ता तसेच बाजारपेठांमधून शुकशुकाट  दिसू लागला आहे.