होमपेज › Konkan › लघु उद्योजकांना उभारी देण्यात जिल्हा बँक यशस्वी

लघु उद्योजकांना उभारी देण्यात जिल्हा बँक यशस्वी

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:57PM

बुकमार्क करा

कुडाळ : वार्ताहर

जिल्हा बँक ही लघुउद्योजकांना उभारी देण्यास यशस्वी ठरलेली बँक आहे. मराठी माणूस हा कर्ज घेण्यास घाबरत असल्याने तो व्यवसायात मागे पडत आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत शेळीमेंढी पालन, दुग्धव्यवसाय यासारख्या उद्योजकांना कर्जाच्या माध्यमातून समृध्द करण्यास यश मिळवले आहे. जिल्हा बँकेच्या शेतीपूरक उपक्रमांचा जनतेने लाभ घ्यावा,असे आवाहन  माजी खा. नीलेश राणे यांनी कुडाळ येथील कुक्कुटपालन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

कुडाळ येथील पशु-पक्षी मेळाव्यामध्ये सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने कुक्कुटपालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन माजी खा. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, जि.प. उपाध्यक्ष रणजित देसाई, आनंद शिरवलकर, संजू परब, विशाल परब, मनिष दळवी, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.
निलेश राणे पुढे म्हणाले,मराठी माणसाने आता व्यवसायात उतरणे गरजेचे आहे. जिल्हा बँक  जिल्ह्यातील व्यवसायीकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असताना व्यवसाय यशस्वी होणार की नाही,याची चिंता करू नये. जिल्हा बँकेच्या  कर्ज विषयक सकारात्मक धोरणामुळे जिल्ह्यात अनेक व्यावसायिकांना सुसंधी मिळत आहे. जिल्ह्यात कोंबडी, दुग्धव्यवसाय, शेळीमेंढी यासारख्या व्यवसायात उत्तमरित्या झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात व्यवसायासंदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर जिल्हा बँकेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा बँकेनेही यापुढे अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवावेत,असे सूचित केले.सतीश सावंत म्हणाले,जिल्हा बँकेच्या वतीने  कोंबडी, दुग्ध व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करून देत  खर्‍या अर्थाने जिल्हा घडविण्याचे  काम आम्ही सुरू केले आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात जिल्हा बँकेची कर्ज विषयक भूमिका  महत्वाची ठरल्याचे सांगितले.यावेळी सावंत यांनी कर्जाबाबत व राबविलेल्या उपक्रमांबाबत  सविस्तर माहिती दिली.

 यानंतर झालेल्या मार्गदर्शन सत्रात डॉ. संदीप भोसले यांनी ‘कोंबडी व्यवसायातील खाद्य व्यवस्थापन’ याबाबत माहिती दिली. डॉ. अभ्युदय साळुंखे यांनी ‘बॉयलर व गावरान कोंबडी’ यावर मार्गदर्शन केले.यावेळी चार पशुपालकांचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.