Tue, Jul 23, 2019 06:14होमपेज › Konkan › चेन मार्केंटिंग करणार्‍या दुकानाला युवासेनेचा दणका

चेन मार्केंटिंग करणार्‍या दुकानाला युवासेनेचा दणका

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:08PMकुडाळ : वार्ताहर

आयुर्वेदाच्या नावाखाली चेन मार्केटिंगद्वारे व्यवसाय करत ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत कुडाळ शहरातील हिंदुस्थान आयुर्वेद या दुकानाचे शटर युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद करायला भाग पाडले. ‘मेथी कुुटून द्या व दरमहा तीन हजार कमवा’अशी ऑफर या व्यावसायिकाकडून देण्यात येत असून यातील वस्तुस्थितीचा अभ्यास केल्यास ही एक फसवणूकच आहे, असा आरोप युवासेनेकडून करत या कंपनीच्या एका महिलेसह दोघांना सोबत घेत पोलिस  स्टेशन गाठले. मात्र, यांच्याकडे कोणतेही अन्न भेसळ विभागाचे प्रमाणपत्र,नगरपंचायतीची परवानगी मिळाली नाही. आता पोलिसांच्या सूचनेनुसार या दुकानाची  चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कुडाळ शहरातील हिंदुस्थान आयुर्वेद नावाचा व्यवसाय महिनाभरापूर्वी  सुरू करण्यात आला होता. या कंपनीमार्फत काम करण्यासाठी कोणत्याही महिलेने प्रथम 6 हजार 500 रू. भरल्यानंतर त्यांना चार किलो मेथी, वजन काटा, मेथी भरून देण्यासाठी डबे, चमचे असे साहित्य दिले जाते. दर महिन्याला केवळ चार किलो मेथी भाजून ती भरडून द्यावी व असे केल्यावर त्या महिलेला दरमहा तीन हजारांचा धनादेश सुपूर्द केला जातो. मात्र, तसेच एका व्यक्तीने एक मेंबर केल्यास त्याला आणखी दोन हजार रू. दिले जातात. केवळ चार किलोच मेथी कुटून देण्यासाठी दरमहा मिळणारे तीन हजार रू. व एक मेंबर केल्यास आणखी दोन हजार रू. देणे यातून फसवणूक होत असून चेन मार्केटिंगचा हा प्रकार असल्याची तक्रार शिवसेनेच्या काही महिला नगरसेविकांकडे शहरातील महिलांनी केली होती.  या नगरसेवकांनी प्रत्यक्षात जावून तिथे खात्री  केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही. यानंतर शुक्रवारी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्यासह युवससेनेच्या काही कार्यकर्त्यांनी डमी गिर्‍हाईक म्हणून जात याबाबत चौकशी केली. यावेळी येणार्‍या महिलांकडून प्रत्येकी 6 हजार 500 रू. याप्रमाणे पैसे गोळा करून घेतले जात असून हा फसवणुकीचा व चेन मार्केटिंगचा प्रकार असल्याचे निदर्शनात आले. यानंतर युवासेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसेना, नगरसेविका या कार्यालयात दाखल होत या घटनेचा पर्दापाश केला. प्रथमदर्शनी 40 महिलांकडून असे पैसे घेतले असल्याचे निदर्शनास आले. तसेच या व्यवसायाबाबत नगरपंचायतीचा परवाना विचारल्यावर येथील श्री. होडावडेकर नामक व्यक्तीने जीएसटी नंबर एक कागद दाखवला. मात्र त्याचा परवान्याशी कोणताही संबंध नव्हता. तसेच या मेथीपासून आयुर्वेदीक प्रॉडक्ट बनवले जात असल्याचेे त्यांच्याकडे अन्नभेसळ विभागाचे कोणतेही प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे हा सर्व संशयास्पद प्रकार असल्याचे निदर्शनास येताच युवासेनेने या दुकानाचे शटर तत्काळ बंद करण्यास भाग पाडत आतील कर्मचारी मुलींच्या पगाराचे पैसेही त्वरित देण्यास भाग पाडले. यानंतर पोलिस स्थानकात या दोघांनाही नेलेेे. येथील पोलिस निरीक्षक श्री. काकडे यांनी नगरपंचायत व अन्नभेसळ विभागामार्फत चौकशी करण्याच्या सूचना देत यानुसार आपण जाब जबाब नोदवून घेऊ व त्यानुसर पुढील कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. यावेळी जि.प. सदस्या सौ.वर्षा कुडाळकर, नगरसेविका श्रेया गवंडे, मेघा सुकी, शिवसेना महिला शहरप्रमुख सौ. सुप्रिया मांजरेकर, संदीप म्हाडेश्‍वर, कृष्णा तेली, सागर जाधव, रुपेश कांबळी, लकी सावंत आदी उपस्थित होते.