Sun, Aug 25, 2019 03:39होमपेज › Konkan › बँक फोडून १५ लाखांचा ऐवज लंपास

बँक फोडून १५ लाखांचा ऐवज लंपास

Published On: Jul 15 2018 10:55PM | Last Updated: Jul 15 2018 10:18PMकुडाळ : शहर वार्ताहर

मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी-भटवाडी येथील विदर्भ-कोकण ग्रामीण बँक अज्ञात दरोडेखोरांनी फोडल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यात सुमारे पाच लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दहा लाखांचे दागिने असा जवळपास पंधरा लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण बँकच या दरोडेखोरांनी लुटली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

दरोडेखोरांनी बँक फोडण्यासाठी वापरलेले सर्व साहित्य बँकेतच टाकून पलायन केले. भरवस्तीत असलेली ही बँक फोडून दरोडेखोरांनी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाला आव्हान दिले आहे. या घटनेत सराईत चार ते पाच जणांची टोळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त करीत लागलीच जलद गतीने तपास सुरू केला आहे.

 पावशी ग्रा.पं.समोर भटवाडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची ही शाखा आहे. शुक्रवारी सायंकाळी ही शाखा बंद करून अधिकारी व कर्मचारी घरी गेले. रविवारी सकाळी 8 वा. च्या सुमारास या बँकेच्या शेजारील घरात भाडेकरू असलेल्या धुरी यांना बँकेची खिडकी तोडल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी लागलीच बाजूच्या ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी बँक कर्मचारी व सरपंच, पोलिसपाटील यांना याबाबत माहिती दिली. सरपंच व पोलिसपाटील यांनी लागलीच कुडाळ पोलिसांना याची माहिती दिली.

 बँकेच्या खिडकीचा दरवाजा दरोडेखोरांनी तोडून लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजे उघडून रोख रक्कम व दागिने ठेवण्याची स्ट्राँग रूम दरोडेखोरांनी टार्गेट करीत ती गॅसकटरने फोडली. त्यातील सुमारे पाच लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम तसेच दहा लाख रु. चे ग्राहकांनी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने (दागिने असलेले 24 पाऊच) लंपास केले. दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले एक ऑक्सिजन सिलिंडर, एक घरगुती सिलिंडर, गॅसकटर, कटावणी, पहार, स्क्रू आदी साहित्य बँकेतच टाकून पलायन केले. या घटनेत प्रथमदर्शनी माहितीवरून रोख रक्कम व दागिने मिळून सुमारे पंधरा लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याची  पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी दिली.

 पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जगदीश काकडे व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक पाटील, पो.हे.कॉ. सायमन डिसोजा, डुमिंग डिसोजा, पी.जी.मोरे, सुनील सावंत, अविनाश ओटवणेकर, उद्धव साबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान कणकवलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक श्री.फडणवीस, शाहू देसाई, सुधीर सावंत, संतोष सावंत, अनुप खंडे, जगदीश दुधवडकर, सत्या पाटील आदींनी घटनास्थळी तपास सुरू केला. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, सिंधुदुर्गात सध्या श्‍वानपथक नसल्याने रत्नागिरी येथील श्‍वानपथकाला माहिती देण्यात आली. दुपारी हे पथक पावशी येथे येण्यास निघाले होते. सभापती राजन जाधव, जि.प.सदस्य अमरसेन सावंत, सरपंच भिकाजी (बाळा) कोरगांवकर यांच्यासह गोट्या शिरोडकर, बंटी तुळसकर, पोलिसपाटील शेखर शेलटे, कांता वाटवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  बँकेचे मॅनेजर चंद्रकांत सावंत मुंबई येथे कामानिमित्त गेल्याने कॅशिअर सौ.अदिती नारायण ठुंबरे यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. सौ.ठुंबरे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
चोरटे सराईत!

महामार्गालगत भरवस्तीत असलेली ही बँक दरोडेखोरांनी टार्गेट केली. अगदी आजूबाजूच्या लोकांना चाहूलही न लागता रात्री अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ही  बँक लुटली. यात किमान पाच ते सहाजणांचा सहभाग असून सराईत टोळी असल्याचा अंदाज  पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी व्यक्त केला. या धाडसी चोरीने सर्वत्र खळबळ उडाली उडून दरोडेखोरांच्या मुसक्या आवळणे सिंधुदुर्ग पोलिसांसमोर आव्हान आहे.

 शनिवार रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंतच्या वेळेत दरोडेखोरांनी हे काम फत्ते केले. भर पावसात दरोडेखोरांनी हा डाव साधला. महामार्गावर गाडी उभी करून अगदी सराईतपणे दरोडा टाकत गॅसकटरने स्ट्राँग रुमसह तिजोरी फोडली. गॅसचा वापर करण्यात आला. मात्र आजूबाजूच्या लोकांना काहीच कल्पना येऊ नये याची दक्षता या दरोडेखोरांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे

 जिल्हा पोलिस अधीक्षक सुट्टीवर असल्याने त्याचा कार्यभार रत्नागिरीचे अतिरिक्त पो.अधीक्षक  नीतेश गिट्टे यांच्याकडे सिंधुदुर्गचा चार्ज असल्याने ते सिंधुदुर्गात दाखल झाले.