Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Konkan › मत्स्यगंधा एक्स्प्रेस चोरट्यांकडून टार्गेट!

मत्स्यगंधा एक्स्प्रेस चोरट्यांकडून टार्गेट!

Published On: Aug 05 2018 9:59PM | Last Updated: Aug 05 2018 9:31PMकुडाळ : वार्ताहर 

कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्स्प्रेस चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येते. याच रेल्वेत चोरीच्या सर्वाधिक घटना घडत असून गेल्या तीन महिन्यात या रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा तब्बल साडेपाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मध्यरात्री या रेल्वेतील प्रवासी गाढ झोपेत असल्याचा फायदा उठवत चोरटे लाखोंचा मुद्देमाल सहज चोरत असून रेल्वे प्रशासनाने मात्र या चोर्‍या रोखण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली दिसत नाही. मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही कोचीवली (केरळ) ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल दरम्यान धावते.  ही रेल्वे जाताना व येताना दोन्हीवेळा कोकण पटट्यातून मध्यरात्रीच्या वेळेस प्रवास करते. त्यामुळेे या चोर्‍या कोकणपट्ट्यातच घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी या गाडीत केवळ एका तासात तीन प्रवाशांना लुटून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. यानंतर आता ऑगस्टच्या सुरुवातीसच अशाच प्रकारे तीन प्रवाशांना लुटून अडीच लाखांच्या मुद्देमाल चोरीस गेला. दोन्ही वेळच्या चोर्‍या या रात्री 12 वा. ते 1 वा. या वेळेत घडल्या असून या चोरीची माहिती प्रवाशांना रेल्वे कुडाळात आल्यावरच मिळाली. कारण  रेल्वे रत्नागिरीतून सुटल्यावर थेट कुडाळात थांबते. मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील बरेच प्रवाशी लांब पल्ल्याचा प्रवास करणारे असतात.त्यामुळे प्रवासी आपल्या दगिन्यांसह किंमती वस्तू सुरक्षेच्या दृष्टीने पर्स अथवा अन्य बॅगमध्ये ठेवतात. चोरटे प्रवाशांच्या या हलचाली अचूक हेरतात व प्रवासी झोपी गेल्यावर आपले काम करून पसार होतात. या गाडीत दोन्हीवेळा चोरी ही रेल्वे कोचिवलीच्या दिशेने जातानाच झाली. ही रेल्वे सुपरफास्ट असली तरी या रेल्वेला येताना अनेकवेळा क्रॉसिंग दिले जाते. याचाच फायदा चोरटे उठवत किमती सामानावर डल्‍ला मारून मधल्या स्टेशनवर उतरून निघून जातात. चोरट्यांनी या रेल्वेला अनेकवेळा टार्गेट केले असले तरी रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही. या रेल्वेत वारंवार चोरी होवूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केलेली नाही. या चोरी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी युनिफॉर्ममधील रेल्वे पोलिसाची गस्त अथवा अन्य उपाययोजना करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ही रेल्वे दुसर्‍या राज्यातून येत असल्याने हे चोरटेही अन्य राज्यातीलच सराईत असण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनेही रेल्वे पोलिसांनी लक्ष ठेवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.