Wed, Jun 26, 2019 12:01होमपेज › Konkan › कुडाळवासीयांनी रोखला महामार्ग

कुडाळवासीयांनी रोखला महामार्ग

Published On: Jul 17 2018 11:00PM | Last Updated: Jul 17 2018 10:37PMकुडाळ : शहर वार्ताहर

कुडाळवासीयांच्या एकजुटीचा विजय असो..., तालुका बचाव समितीचा विजय असो.. आमच्या मागण्या मान्य करा.., हम सब एक है...जिल्हा प्रशासन आणि हायवे अ‍ॅथॉरेटीचा निषेध असो.. अशा घोषणा देत कुडाळ तालुका बचाव समितीने मंगळवारी मुंबई-गोवा ‘महामार्ग रोको’ आंदोलन करत चौपदरीकरणांतर्गत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. कुडाळ शहरासह तालुक्यात झाराप, तेर्सेबांबर्डे, बिबवणे, वेताळबांबर्डे, हुमरमळा येथेही महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनामुळे महामार्ग सुमारे दोन तास ठप्प झाला होता. पोलिसांनी 70 हून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. ही तर एक झलक होती, मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी कुडाळ बचाव समितीने प्रशासनाला दिला.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कुडाळ तालुक्यातील कसाल ते झाराप या टप्प्याचा समावेश आहे. मात्र, या चौपदरीकरण आराखड्याबाबत स्थानिक नागरिकांचे अनेक आक्षेप असून याबाबत शासन व ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या नागरिकांचा आहे. या समस्यांचे योग्य  निराकरण व्हावे, यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी  व कुडाळ शहरवासीयांनी एकत्र येत कुडाळ तालुका बचाव समिती स्थापन केली. या समितीच्या माध्यमातून या समस्या सोडविण्यासाठी समिती पदाधिकार्‍यांनी या पूर्वी जिल्हाधिकार्‍यांसह हायवे अ‍ॅथॉरेटीचे लक्ष वेधले. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने या समितीने मंगळवारी महामार्ग रोको आंदोलनाची हाक दिली. कुडाळ शहरात उड्डाणपूलासह मोठे सर्कल व्हावे, झाराप ते कसाल दरम्यान ठिकठिकाणी अंडरपास, सर्विस रोड व्हावेत, अशा प्रमुख मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका बचाव समितीने मंगळवारी कुडाळ राज हॉटेल जवळ महामार्ग रोको आंदोलन छेडले. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. राजीव बिले यांच्यासह भाजपाचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, शिवसेनेचे जि.प.सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.चैताली भेंडे, माजी सभापती सुनील भोगटे, स्वाभिमानचे आनंद शिरवलकर, संजय भोगटे आदींसह सर्वपक्षीय व तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. 
कुडाळ-उद्यमनगर येथे बचाव समिती पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष अ‍ॅड. बिले म्हणाले, चौपदरीकरणातील समस्यांबाबत आपण जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन दिले. मात्र, प्रशासनाने कुडाळवासीयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे  आपण आज रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनाबाबत खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,  मनसेचे माजी आ.परशुराम उपरकर आदींनी फोन करून पाठींबा दर्शविला आहे. हायवे चौपदरीकरणांतर्गत सर्व मागण्या व समस्यांची पूर्तता होईपर्यंत बचाव समिती लढा देतच राहील.  काका कुडाळकर म्हणाले, हे आंदोलन कोणताही पक्ष अथवा सरकारच्या विरोधात नाही तर प्रशासनाच्या विरोधात आहे. सुनील भोगटे म्हणाले, सोमवारी बचाव समितीच्या हायवे अ‍ॅथॉरेटीच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत अधिकार्‍यांनी काही सकारात्मक गोष्टी मान्य केल्या आहेत. मात्र, हा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. धीरज परब, संजय भोगटे, अमरसेन सावंत, राजन बोभाटे, चंद्रकांत अणावकर आदींनी मार्गदर्शन केले.
सुरूवातीला बचाव समितीने राज हॉटेल जवळ महामार्ग रोखत आंदोलन छेडले. त्यानंतर महामार्गावरून लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप पर्यंत चालत जात महामार्गावरच ठाण मांडले. आंदोलकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करीत ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. आंदोलनादरम्यान कुडाळात जादा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक जगदीश काकडे स्वतः आंदोलनावर लक्ष ठेवून होते.

दरम्यान तालुक्यातील तेर्सेबांबर्डे, झाराप येथे येथे महामार्ग रोको आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली. स्वाभिमानचे विभाग प्रमुख रूपेश कानडे, तेर्सेबांबर्डे सरपंच संतोष डिचोलकर, साळगाव सरपंच उमेश धुरी, भास्कर परब, अमित दळवी, रामचंद्र परब आदींसह झाराप, साळगांव, तेर्सेबांबर्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. बिबवणे लक्ष्मी नारायण विद्यालय समोर बिबवणेतील ग्रामस्थांनी आंदोलन करून निदर्शने केली. वेताळबांबर्डे तिठ्याजवळ ग्रामस्थांनी महामार्गावर झाड तोडून वाहतूक रोखली. तसेच हुमरमळा येथेही महामार्ग रोको आंदोलन छेडण्यात आले. तालुक्यात सर्वत्र आंदोलनादरम्यान सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. ठिकठिकाणी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

कुडाळसह तालुक्यातील सर्व ठिकाणच्या आंदोलनातील सुमारे 70 हून अधिक आंदोलनकर्त्यांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.