Tue, Mar 26, 2019 20:28होमपेज › Konkan › जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामांबाबत तारांकित प्रश्‍न! 

जलयुक्त शिवारच्या प्रलंबित कामांबाबत तारांकित प्रश्‍न! 

Published On: Dec 15 2017 2:45AM | Last Updated: Dec 14 2017 10:12PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना लागू झाल्यानंतर 2015-16 व 2016 -17 पर्यंत असणारी एकूण 257 प्रलंबित कामे कधी पर्यंत पूर्ण करण्यात येतील? असा खडा सवाल आ. वैभव नाईक यांनी सभागृहात उपस्थित केला.  या कामांसाठी नवीन दरसूची जाहीर करावी, तसेच कामे पूर्ण होण्याचा कालावधी निश्‍चित करावा अशी मागणी केली. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सिंधुदुर्गसह कोकणातील जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिले असल्याची माहिती आ. नाईक यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना दिली. 

  आ. वैभव नाईक यांनी नागपूर अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. महाराष्ट्र राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजना राबविली जात आहे.   या योजनेच्या तिसर्‍या टप्प्यासाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 14 कोटी 41 लाख 53 हजार रुपये एवढा निधी मंजूर केला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग  यांच्याकडील  प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण 333 कामांपैकी 98 कामे  प्रलंबित असून 93 कामे प्रगतीपथावर आहेत.  तर सन 2015-16 सालची आतापर्यंत 66 कामे प्रलंबित आहेत. अशी एकूण मागील दोन वर्षांतील एकूण 257 कामे अपूर्णावस्थेत आहेत. या अपूर्ण कामामुळे शासन निधीचा वेळेत विनियोग होत नाही. परिणामी योजनेच्या मूळ उद्देशाला बाधा येत असल्याबाबत आ. नाईक यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सन 2016-17 साली एकूण 191 कामे प्रलंबित असताना उत्तरामध्ये फक्त 32 कामांचा उल्लेख केलेला आहे. याबाबत चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोपही आ. नाईक यांनी सभागृहात केला. 

शासनाच्या तिजोरीत 1561 लक्ष निधी उपलब्ध आहे, याकामी मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग लाभून  या कामांसाठी लोकांची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, तरी सुद्धा उपलब्ध निधी अखर्चित ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कोणती कारवाई मंत्री करणार? असा सवाल केला. यावेळी ना. राम शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 228 प्रस्तावित कामे होती त्यातील 206 कामे पूर्ण झालेली आहेत. सन 2015-16 व 2016-17  मधील कामांचा  आढावा घेण्यात आला असून 2017-18 मधील कामांच्या नियोजनाबाबतचीही माहिती घेतली असून जलयुक्त शिवारच्या कामांसाठी निधीची अडचण नाही. वेळेत काम पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश दिले असल्याचे सांगितले.