Sat, Sep 22, 2018 13:05



होमपेज › Konkan › कासवांसह चंदन बाळगले ७ जणांना पोलिस कोठडी

कासवांसह चंदन बाळगले ७ जणांना पोलिस कोठडी

Published On: Aug 11 2018 10:33PM | Last Updated: Aug 11 2018 10:33PM



कुडाळ : प्रतिनिधी

वनविभागाने वेंगुर्ला कॅम्प परिसरात टाकलेल्या धाडीत अवैधरीत्या पकडून ठेवलेल्या जीवंत कासवाचे अवशेष, चंदनाची लाकडे व शिकारीचे साहित्य मिळून 2 लाख 88 हजार 408 रुपयांच्या मुद्देमालासह सात संशयितांना  वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी ताब्यात घेत अटक केली होती. या सातही संशयितांना शनिवारी वेंगुर्ला  न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने  गुरुवार 16 ऑगस्टपर्यंत संशयितांना  पोलिस कोठडीत ठेवण्याचे  आदेश दिले  आहेत. दरम्यान, या प्रकरणात अन्य दोन संशयीत फरार असुन त्यांच्या शोधासाठी वनविभागाचे पथक मागावर आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील शासकीय वनात चंदनाची झाडे तोडून तासकाम करून गाभ्याचे निवळ चंदन तयार करून विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत विक्री करणे तसेच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार संरक्षित असलेल्या वन्यप्राणी कासव यांना ताब्यात ठेवून विक्रीचा प्रयत्न करणे, त्यांचे मांस खाणे याप्रकरणी संशयित  आरोपी अजित गणपत गावडे, मयुर विजय आंगचेकर, गणेश अनंत गिरी, सुरेश जयराम पवार, चंदु जयराम पवार, शिवाजी तुकाराम पवार व राजु अर्जुन पवार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या गुन्ह्याबाबतची माहिती वन्यजीव रक्षक तथा सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणीक यांना माहिती देण्यात आली. त्यांनी संशयितांचे व साक्षीदारांचे समक्ष जबाब नोंदवीला. गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयासमोर हजर करून जीवंत नऊ कासवांना नैसर्गिक अधिवासात सोडुन देण्यात आले. संशयित सातही आरोपींना वेंगुर्ला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबतचा अधिक तपास उपवनसंरक्षक समाधान चव्हाण, साहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल पी.जी.कोकीतकर,फिरते पथकचे संजय कदम, कडावल वनक्षेत्रपाल अमोल चिरमे,  मठ वनपाल रामचंद्र मडवळ, तुळस वनरक्षक सावळा कांबळे, विष्णु नरळे आदी करत आहेत.