Fri, May 24, 2019 02:29होमपेज › Konkan › माणगाव मंडल अधिकार्‍यांना कार्यालयात घुसून मारहाण 

माणगाव मंडल अधिकार्‍यांना कार्यालयात घुसून मारहाण 

Published On: Jun 22 2018 10:36PM | Last Updated: Jun 22 2018 10:01PMकुडाळ : प्रतिनिधी

माणगावचे मंडल अधिकारी चिंतामण गंगाराम भोये (वय 50) यांना माणगाव-बंदीचा माड येथील  सचिन रमेश सावंत याने शुक्रवारी सकाळी 11 वा. च्या सुमारास कार्यालयात घुसून मारहाण केली. श्री. भोये यांच्या तक्रारीवरून सचिन सावंत याला शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली. तर सचिन सावंत याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मंडळ अधिकारी श्री. भोये यांच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. सावंत याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता 15 हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, पुढील आदेश होईपर्यंत कुडाळ पोलिस स्थानकात सकाळी 10 वा. पर्यंत हजेरी लावण्याचे आदेश दिले. 

 सचिन सावंत आपल्या बांधकामाच्या सात-बारासाठी शुक्रवारी सकाळी 11 वा. मंडळ कार्यालयात  गेला होता. त्यावेळी कार्यालयात तलाठी नव्हते. तलाठी नाहीत, तर तुम्ही सात-बारा द्या, अशी मागणी त्याने मंडल अधिकारी श्री. भोये यांना केली. दरम्यान, सचिन सावंत याने मोबाईल कॅमेर्‍याद्वारे कार्यालयाचे शूटिंग करण्यास सुरुवात केली. त्यावर शूटिंग करण्याला श्री. भोये यांनी आक्षेप घेतला. यावरून श्री. भोये व सावंत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. 

या नंतर सचिन सावंत याने श्री. भोये यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. या मारहाणीत भोये यांच्या डाव्या पायाच्या मांडीला व डोक्याच्या वरच्या बाजूला दुखापत झाली. असे पोलिसात दाखल तक्रारत नमूद करण्यात आले आहे. 

या तक्रारीनुसार माणगाव पोलिसांनी सचिन सावंत याच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.सर्कलच्या मुलाने शिविगाळ व धक्काबुक्की केल्याची तक्रार
सचिन सावंत याने मंडल अधिकारी भोयेंच्या मुलाने पोलिस स्थानकात आपल्याला धक्काबुक्की केली तसेच श्री. भोये यांनी शिविगाळ केल्याची तक्रार माणगांव पोलिसांकडे दिली. या तक्रारीनुसार भोये यांच्या मुलावर माणगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याचे श्री. सावळ यांनी सांगितले. या घटनेची दखल घेत कुडाळ तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष अरूण देसाई यांनी माणगाव पोलिस स्थानकात धाव घेतली.  पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांनी माणगांव पोलिस स्टेशनला भेट दिली.  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदानंद सावंत, सचिन सोन्सुरकर, हनुमंत धोतरे, अजय फोंडेकर उपस्थित होेते. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदानंद सावळ करीत आहेत.