Mon, Mar 25, 2019 17:49होमपेज › Konkan › एम. के. गावडे राष्ट्रवादीत

एम. के. गावडे राष्ट्रवादीत

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 9:46PMकुडाळ : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँगे्रसच्या स्थापनेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम केलेले कृषिभूषण तथा उद्योजक एम. के. गावडे यांनी गुरुवारी नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेसमधून राष्ट्रवादी, तर राष्ट्रवादीतून काँग्रेस व परत राष्ट्रवादी असा त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. एम. के. गावडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सिंधुदुर्ग राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळणार आहे. 

नागपूर विधानभवनाच्या राष्ट्रवादीच्या दालनात हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. माजी मंत्री तथा नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बंग, माजी मंत्री अनिल देशमुख, सचिन आईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी शिवाजीराव गर्जे, आ. प्रकाश गजभिये, हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय दलाल, माजी आ. दीनानाथ पडोळे, अशोक धात्रक, मुंबई सचिवालय  जिमखानाचे सचिव अशोक पाडावे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रमोद धुरी आदी उपस्थित होते.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणार्‍या एम. के. गावडे यांनी सिंधुदुर्गात राष्ट्रवादी संघटना वाढीसाठी सुरुवातीलाच प्रामाणिक प्रयत्न केले होतेे. त्यांच्या कामाची पक्ष नेतृत्वाने दखलही घेतली होती. मात्र, गटातटात त्यावेळी त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी 2010 मध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या उपस्थितीत  मुंबई येथे ज्ञानेश्‍वरी बंगल्यावर नारायण राणे यांची भेट घेत कणकवली येथे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता.त्यावेळी त्यांना जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरीपदही देण्यात आले होते.  दरम्यान, प्रवीण भोसले दोन वर्षांतच  पुन्हा स्वगृही परतले.  मात्र, गावडे काँग्रेसमध्येच राहिले. जिल्हा बँक निवडणुकीतही त्यांना नेतृत्वाने थांबण्याची विनंती केल्याने ती संधीही त्यांना हुकली. परिणामी ते राजकारणापासून गेली काही वर्षे अलिप्त  होते. मात्र, सहकार, उद्योग, दुग्ध व कृषी क्षेत्रात त्यांचे  काम सुरू होते.