Sat, Jul 20, 2019 23:22होमपेज › Konkan › शिवसेनेची सत्तेशी नाही तर जनतेशी  बांधिलकी :  ना. शिंदे

शिवसेनेची सत्तेशी नाही तर जनतेशी  बांधिलकी :  ना. शिंदे

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 9:09PMकुडाळ : प्रतिनिधी

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असून शिवसेना प्रथमच ही निवडणूक लढवित आहे.  आज शिवसेना सत्तेत  असली तरी जनतेच्या विरोधात निर्णय झाले तर त्या निर्णयाला विरोध करण्याचे काम शिवसेना करत आहे.कारण शिवसेनेची बांधिलकी सत्तेशी नाही तर जनतेशी आहे, असे प्रतिपादन  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोकण पदवीधर मतदार संघाचे सर्व प्रश्‍न शिवसेनेच्या माध्यमातून सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचार निमित्त गुरूवारी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ना.शिंदे यांनी पदवीधर मतदार व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, आ. वैभव नाईक, आ. रवींद्र फाटक, महिला आघाडी अध्यक्ष जान्हवी सावंत, युवक अध्यक्ष मंदार शिरसाट, हर्षद गावडे, जि.प. गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, कुडाळ सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, महिला तालुकाप्रमुख शिल्पा घुर्ये, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ आदीसह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच उपस्थित होते. 

ना. शिंदे म्हणाले ,  शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या पठडीत तयार झालेले आहेत. त्यांनी ठाण्यामध्ये शिक्षण क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम केले आहे. लोकांच्या न्याय हक्कासाठी संजय मोरे हे रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे  त्यांच्यावर पोलिस केसेस आहेत.   जे जनतेसाठी काहीच करत नाहीत त्यांच्यावर केसेस कशा होणार? असा सवाल ना. शिंदे यांनी  करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. शिवसेना उमेदवार संजय मोरे व  मतदारसंघातील इतर उमेदवारांची पार्श्‍वभूमी मतदारांनी जरूर तपासावी, असे आवाहन त्यांनी केेले. शिक्षक हे विद्यादानाचे काम करणारे मतदार आहेत. त्यांना कुणीच विकत घेवू शकत नाही. पदवीधर मतदारही विरोधकांच्या आमिषाला बळी पडणार नाही. पालघरमध्ये जे घडले ते या निवडणुकीत होणार नाही. पालघरमध्ये ते जिंकले तरी ते हरलेलेच आहेत, असे शिंदे यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला. 

 ना. केसरकर म्हणाले, विरोधक शाळेंना संगणक, प्रोजेक्टर देण्याची आमिषे दाखवत आहेत. त्यांना बळी पडू नका. लवकरच नियोजनमधील निधीतून जिल्ह्यातील सर्व शाळा ई लर्निंगमध्ये घेतल्या जातील, त्यामुळे शाळांना कुणाकडून लाच घेण्याची गरज नाही. खा. राऊतांच्या प्रयत्नाने झाराप येथे मुंबई उपकेंद्र सुरू होणार आहे. सिंधुुदुर्गात पहिले डाटा सेंटर व ट्रेनिंग सेंटर सुरू होवून विद्यार्थ्यांना  ज्ञानाचे दरवाजे खुले होणार आहे. आचारसंहिता संपताच या कामांना गती मिळेल. ही सर्व कामे माझ्यासाठी, शिवसेनेसाठी नाही तर तुमच्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा असे सांगितले. 

खा. राऊत म्हणाले, संंजय मोरे यांची उमेदवारी निश्‍चित झाली त्याचवेळी शिवसेना व युवा सेना पदाधिकार्‍यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली. माझ्या लोकसभा मतदारसंघात 21 हजार मतदार असून त्यातील सर्वाधिक मते शिवसेनेला पडतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पदाधिकार्‍यांनी ठरवून दिलेली कामे करावीत, अशा सक्तसूचना देत विरोधी उमेदवाराने आपल्या आमदारकीच्या काळात 6 वर्षे मतदारसंघात तोंड दाखविले नाही. 

विरोधक शाळांना आमिषे दाखवत असल्याची टीका त्यांनी केली. अरूण दुधवडकर यांनी पदाधिकार्‍यांनी गाफील न राहता पक्षप्रमुखांना विजय भेट द्या, असे आवाहन केले.  सिंधुदुर्गात मतदार कमी आहेत तरी सर्वाधिक मतदान शिवसेनेला होईल, असा विश्‍वास आ. वैभव नाईक यांनी व्यक्त केला.