Mon, Apr 22, 2019 03:44होमपेज › Konkan › जिल्ह्यात नवीन 88 तलाठी,15 मंडल कार्यालये!

जिल्ह्यात नवीन 88 तलाठी,15 मंडल कार्यालये!

Published On: Aug 03 2018 10:40PM | Last Updated: Aug 03 2018 10:22PMकुडाळ : शहर वार्ताहर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातबाराचे प्रमाण तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यात 88 तलाठी सजा व 15 मंडल कार्यालयांची नव्याने निर्मिती केली आहे. यात कुडाळ-मालवणमध्ये 29 तलाठी सजा व 4 मंडल कार्यालये नव्याने निर्मिती झाली असल्याची माहिती आ. वैभव नाईक यांनी   दिली.

कुडाळ  सभापती दालनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत आ.नाईक बोलत होते. जि.प.सदस्य अमरसेन सावंत, माजी जि. प. सदस्य संजय भोगटे, माजी पं.स.सदस्य अतुल बंगे, बबन बोभाटे, पावशी उपसरपंच दीपक आंगणे आदी उपस्थित होते.

आ.नाईक म्हणाले, राज्यात शासनाने  269 तलाठी सजा व 46 महसुली मंडळांची नव्याने निर्मिती केली आहे. यात सर्वाधिक तलाठी व मंडळे सिंधुदुर्गात निर्मिती झाली आहेत. सन 2017 मध्ये याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी, पालकमंत्री  दीपक केसरकर व आपण याबाबत पाठपुरावा   केला होता. कुडाळ व मालवण या दोन तालुक्यांमध्ये 29 तलाठी सजा व 4 महसुली मंडळे नव्याने निर्माण झाली आहेत. याचा लोकांना मोठा फायदा होणार आहे. या नव्याने निर्मिती झालेल्या तलाठी सजामध्ये त्या भागातील तलाठ्याकडे तात्पुरता कार्यभार राहणार आहे. नवीन तलाठी देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

...तर तलाठ्यांची गय नाही

जिल्ह्यातील संगणकीकरण सातबाराचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. त्यानंतर प्रत्येक तलाठ्यास लॅपटॉप देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा देताना तलाठ्यांना सोपे जाणार आहे. लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. मात्र, यात लोकांची गैरसोय झाल्यास आणि तलाठ्यांनी हयगय केल्यास तलाठ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आ.नाईक यांनी यावेळी दिला.

कुडाळात रजिस्ट्रार  कार्यालयासाठी प्रयत्न

कुडाळ तालुक्यासाठीचे रजिस्ट्रार कार्यालय कुडाळ शहरात व्हावे यासाठी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे यांनी पाठपुरावा केला. हे कार्यालय ओरोसला असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. हे कार्यालय कुडाळ येथे व्हावे याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण पाठपुरावा केला आहे. त्यावर ना.पाटील यांनी विशेष बाब म्हणून हे कार्यायल कुडाळ शहरात होण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याबाबतचे आदेश महसूलच्या प्रधान सचिवांना दिले आहेत, अशी माहिती आ.नाईक यांनी दिली.