Mon, Mar 25, 2019 17:29होमपेज › Konkan › कोसुंब येथे घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास 

कोसुंब येथे घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास 

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:39PM

बुकमार्क करा

देवरूख : वार्ताहर

घरात कोणीच नसल्याची संधी अज्ञात चोरट्याने साधून सोन्या- चांदीचे दागिने, रोख रक्‍कम असा एकूण 1 लाख 29 हजार 560 रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना संगमेश्‍वर तालुक्यातील कोसुंब मधलीवाडी येथे बुधवारी उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घरमालक शरदचंद्र जगन्नाथ यशवंतराव यांनी फिर्याद दिली आहे. यशवंतराव हे सेवानिवृत्त ग्रा. पं. विस्तार अधिकारी आहेत. मुलगीचे लग्न झाल्याने कोसुंब येथील घरात यशवंतराव व त्यांच्या पत्नी पुष्पलता हे दोघेच वास्तव्याला असतात.  पुष्पलता यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी दोघेही रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात दाखल झाले. याठिकाणी शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर ते रत्नागिरी येथील मुलगी रश्मी खामकर यांच्याकडे गेले होते.

दि. 5 रोजी कोसुंब येथील शेजारी शंकर साप्ते यांना घराचे कुलुप तोडल्याचे दिसून आले. त्यांनी ही बाब तात्काळ यशवंतराव यांच्या कानी घातली. यशवंतराव यांनी श्रीयाळ जाधव यास संपर्क करून वस्तुस्थितीची पाहणी करण्यास सांगितले. पाहणीदरम्यान श्रीयाळ यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याची माहिती मिळताच यशवंतराव यांनी कोसुंब ठिकाणी धाव घेतली. यावेळी त्यांना गोदरेज कपाट फोडलेल्या तसेच आतील मौल्यवान वस्तू, रोख रक्‍कम गायब झाल्याचे दिसून आले. याबाबत यशवंतराव यांनी देवरूख पोलिस ठाण्यात चोरीबाबत फिर्याद दिली 
आहे.

देवरूख पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्याने समोरील दरवाजे कुलुप तोडून घरामध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 अंगठ्या 30 हजार रूपये, 5 गॅ्रम वजनाच्या 5 चेन 50 हजार रूपये, 12 ग्रॅम वजनाची चेन 24 हजार रूपये, कानातील मुद्या 4 हजार रूपये, 10 ग्रॅमचे मंगळसूत्र व 2 ग्रॅम वजनाची डबली 4 हजार 300 रूपये, चांदीचे 7 ग्रॅमचे मंगळसूत्र 2 हजार 210 रूपये यांसह चांदीचा करंडा, निरंजने, वाटी, पेला तसेच 12 हजार रूपयांची रोख रक्‍कम असा एकूण 1 लाख 29 हजार 560 रूपयांचा ऐवज गायब असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संग्राम पाटील करीत आहेत.