Sat, Jun 06, 2020 08:01होमपेज › Konkan › कोकण स्थानिक स्वराज्य संस्था; आज मतदान

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था; आज मतदान

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. तिन्ही जिल्ह्यांतील प्रांत कार्यालयांच्या ठिकाणी मतदान होणार आहे. अशी 16 मतदान केंद्रे असून गेल्या चार दिवसांपासून अज्ञातस्थळी सफर करण्यास गेलेले मतदार प्रथम सोमवारी थेट मतदान केंद्रांवर जाऊन मतदान  केल्यानंतरच घरी जाणार आहेत. यावेळी शिवसेनेने आपल्या मतदारांना कुटुंबासहीत चार दिवसांची सफर घडवून आणण्याची मुभा दिली. या निवडणुकीची मतमोजणी दि. 24 मे रोजी होणार आहे.

कोकण  स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते तथा  माजी मंत्री सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे आणि शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे खंदे समर्थक अ‍ॅड. राजीव साबळे यांच्यात थेट लढत आहे. दि. 21 मे रोजी सकाळी 8 ते सायं. 4 या वेळेत मतदान होणार आहे. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 469, रत्नागिरी जिल्ह्यात 259 व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 212 असे 940 मतदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर परिषद व नगर पंचायतीचे नगरसेवक हे या निवडणुकीतील मतदार आहेत.

शिवसेनेचे जिल्ह्यातील मतदार चार दिवसांपूर्वी अज्ञात स्थळी फिरण्यासाठी गेले आहेत. शिवसेना नेते अनंत गीते यांच्यावर सेना उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी आहे. यावेळी प्रथमच रम्य स्थळी जाण्यासाठी कुटुंबासह मतदारांना येण्याची मुभा देण्यात आली. दरम्यान, शिवसेनेचे मतदार गोव्यात असल्याचे सांगितले जात आहे. त्यापाठोपाठ तीन दिवसांपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीचे मतदार महाबळेश्‍वरला गेले असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व मतदार परतताना प्रथम आपापल्या मतदार केंद्रावर मतदान करूनच घरी जाणार आहेत.

दरम्यान, ज्या रम्य स्थळांवरच्या रिसॉर्टवर मतदारांची सोय करण्यात आली आहे, तेथे प्रत्येक जेवणाच्या वेळी एकत्र आलेल्या मतदारांना प्रामाणिकपणे मतदान करा, असे आवाहन करण्यात आले. ज्यांच्यावर मतदारांची सोय पाहण्याची जबाबदारी होती त्या नेत्यांकडून प्रामाणिक मतदानाचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर मतदान कशा पद्धतीने करायचे असते, याचीही माहिती देण्यात आली. 

रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड प्रांत कार्यालयांमध्ये रायगडातील मतदारांचे मतदान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, रत्नागिरी, दापोली, राजापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदान केंद्र आहे. 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.