Tue, Jul 23, 2019 07:02होमपेज › Konkan › खेळा पण जीव सांभाळा

खेळा पण जीव सांभाळा

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 9:13PMरत्नागिरी : प्रमोद करंडे 

साथीचे बळी, उष्म्याचे बळी, दुष्काळाचे बळी जसे जातात तसेच सुट्टीचेही बळी जावू लागलेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटत असताना अनेक बालके व चिमुरड्यांचा हकनाक बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. पोटच्या गोळ्याचा अन् निष्पाप मुलांचा जीव जाताना पाहिला की हृदयाचा ठाव चुकल्याशिवाय राहत नाही. पालकांचे दुर्लक्षच अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे खेळणार्‍या, बागडणार्‍या मुलांकडे पालकांनीही तितकेच लक्ष द्यायला हवे.

सुट्टी म्हणजे बालगोपाळांसाठी आनंदाची पर्वणीच. मग ती सुट्टी कोणतीही असो. त्यात उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर या चिमुरड्यांना सोन्याहून पिवळेच. नो आभ्यास, नो कटकट, नो पालकांची झंझट. सुमारे दोन महिने मौज-मजा अन् मस्तीच. शहरी भागात उन्हाळी अभ्यास वर्ग, वेगवेगळे क्लासेस, प्रशिक्षण असले तरी ग्रामीण भागातील मुलांचा आजही खेळण्याकडे कल आहे. उन्हाळी सुट्टीत नदी, विहिरी, तलाव, बंधारे यावर पोहण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत असते. पोहायला गेलेल्या मुलांवर विशेष लक्ष असायलाच हवे. कोण कोण पोहायला गेले आहे? त्यांच्यासोबत जबाबदार कोणी आहे का? या बाबी गांभिर्याने पहायला हव्यात. अनेकदा पोहण्याच्या नादात कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. जो तो आनंदाने बेहोश होवून मनमुरादपणे पोहण्याचा आनंद लुटत असतो. काहीवेळा पोहता पोहता मस्तीही केली जाते. या गोंगाटात दुर्घटना होण्याची भीती अधिक असते. लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठीही नेले जाते. यावेळी आवश्यक ते सुरक्षा साहित्य सोबत नेले आहे का? शिकवणारी व्यक्‍ती तरबेज अन् जबाबदार आहे का? हेही पहायला हवे. अन्यथा वेळ निघून गेल्यावर काहीच उपयोग होणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवे.

अप्रिय घटनांमुळे उन्हाळ्याची सुट्टी नकोशी व्हायला नको, याची खबरदारी पालकांनी घेण्याची गरज आहे. मुले खेळत असताना ती कोठे आहेत?, काय खेळ खेळताहेत? याकडे लांबून का होईना पण लक्ष असायलाच हवे. पालकांनी वेळीच लक्ष दिले तर दुर्घटना निश्‍चितपणे टळल्या जातील. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी लुटणार्‍या या चिमुरड्यांच्या खेळाचे व्यवस्थापनही तितकेच गरजेचे बनले आहे. चिमुरड्यांकडे अनेकदा पालकांचे लक्ष नसते. त्यातून अनेकदा या बालगोपाळांना दुखापतींचा सामना करावा लागतो. इथपर्यंत ठीक, पण एखाद्या दुर्दैवी घटनेत निष्पाप जीव जेव्हा बळी जातो तेव्हा केलेल्या दुर्लक्षाचा पालकांना पश्‍चाताप होतो. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशा अनेक घटना घडत असतात. या घटनांमुळे पालकांनीही वेळीच सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनी काळजी घेतली तर निष्पाप जीवांचे प्राण नक्कीच वाचतील. मात्र त्यासाठी चिमुरड्यांच्या खेळण्या-बागडण्यावर मर्यादा घालू नये. उन्हाळी सुट्टीचे बळी वाचवण्यासाठी पालकांबरोबरच सर्वांनीच जागरुक राहण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु असेही नाही की त्यांना सर्वच गोष्टींमध्ये मर्यादा हव्यात. चिमुरड्यांना खेळण्या-बागडण्याचा आनंद लुटु द्या. उगाच सुरक्षेचा बाऊही करायला नको हेही तितकेच महत्वाचे. 

रिस्क नको म्हणून अलीकडे काही पालक आपल्या मुलांना शिबिरासाठी तगादा लावतात. ही मानसिकता ओळखून उन्हाळी शिबिराच्या नावाखाली  अलीकडे पैसे उकळणार्‍या संस्थांचा सुळसुळाट वाढला आहे. काही ठिकाणी गुणवत्ता असेलही. वाढते शहरीकरण व पालकांकडून अपुरा वेळ यामुळे या शिबिरांचा व्यवसाय जोमात सुरू असून त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येतेय. वाढत्या  शहरीकरणामुळे सिमेंटची जंगले वाढत चालली असून मोकळ्या जागा कमी पडू लागल्या आहेत. मुलांना खेळायला  मैदाने  उरली  नाहीत. घरात चिऊकाऊच्या गोष्टी सांगणारे आजी-आजोबा आता दुर्मिळ झाले आहेत. उन्हाळी शिबिरे आणि छंद व संस्कार वर्गांसारखे पर्याय पुढे आले आहेत. मात्र पालकांना विभक्त कुटुंबपध्दतीमुळे अनेकदा याच शिबिरांचा पर्याय समोर येतो. पालकांची ही गरज ओळखून सुट्ट्यांच्या काळात या छंद वर्ग, संस्कार वर्ग व उन्हाळी शिबिरांचा व्यवसाय जोमात सुरू झाला आहे. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये  मुलांना काय करायचे हा प्रश्‍न कधीच सतावत नसे. कारण पूर्वी मोठे कुटुंब असे. घरात आजी आजोबा, काका काकू, ताई, आत्या अशी संस्कार करणारी मंडळी असायची. त्यामुळे मुलांवर  आचरणातूनच संस्कार व्हायचे. त्यांना वेगवेगळ्या गोेष्टी शिकायला मिळायच्या. त्यामुळे संस्कारवर्ग, छंद वर्ग तसेच उन्हाळी शिबिरे यांची गरज भासत नसे. काळाच्या ओघात हे वातावरण आज हरवले आहे.

वाढत्या शैक्षणिक सुविधा तसेच रोजगाराच्या शोधात नागरिकांचे लोंढे शहराकडे येवू लागले. खेडी ओस पडू लागली आणि शहरे बकाल स्वरूप घेवू लागली. त्यामुळे शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतला मामाचा गाव, गावची गंमत व गोष्टी आता इतिहास जमा होऊ लागल्या आहेत. मुलांना सुट्टीच्या काळात गुंतवण्यासाठी आणि त्यांना नवे काही शिकता यावे, यासाठी पालक आपल्या मुलांना छंद वर्ग व उन्हाळी शिबिरांमध्ये पाठवतात. मात्र या उन्हाळी वर्गांमध्ये अव्वाच्या सव्वा फी आकारून पालकांची लूट केली जात आहे.उन्हाळी शिबिरामध्ये ट्रेकिंग, रेसलिंग, पोहणे, विविध खेळांचे प्रशिक्षण याचा समावेश असतो. काही शिबिरे निवासी असतात. त्यामध्ये सहभागी मुलांना चहा, नाष्टा व भोजनाची सोय करण्यात येते. त्यासाठी भरलेल्या फीच्या तुलनेत  जेवण व नाष्ट्याची  गुणवत्ता व पौष्टिकता किती असते? हा देखील सांगायला नको. अनेकदा  शिबिरांमध्ये शिकवण्यात येणार्‍या खेळ किंवा कलाकृतीमध्ये  कलाकौशल्यांचा अभाव असतो. एकाच दिवसात अनेक खेळ, कला कृतींचे प्रशिक्षण दिले जाते. केवळ शिबिरातील दिवस भरून काढायचे म्हणून सर्व खेळ किंवा साहसांचे प्रात्यक्षिक दिले जाते. दहा ते पंधरा दिवसांमध्ये  मिळालेल्या प्रशिक्षणाने  शिकलेल्या खेळात निपुणता येणे शक्य नसते. छंद वर्गामध्ये  योगा, क्राप्टींग, आरोमा, चित्रकला शिबिरांमध्ये ठराविक  अभ्यासक्रम घेवून केवळ शिकवण दिली जाते. मात्र, या शिकवणीमध्ये कौशल्य कितपत मुलांनी आत्मसात केले याचे मूल्यमापन होत नाही. त्यामुळे यातील सत्यता पालकांनी ओळखायला हवी.
 

Tags :