Thu, Dec 12, 2019 09:20होमपेज › Konkan › भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव

भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:08PMराजापूर  : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली निसर्गाने नटलेला कोकणचा प्रदेश भकास करून येथील भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचा शासनाचा डाव असून शिवसेनाही त्यामध्ये सामील आहे. मात्र, जनतेला नको असलेल्या रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम येथील जनतेसोबत राहील, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रवक्‍ते खा. हुसेन दलवाई यांनी रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना दिली.

केंद्र शासनाने रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी सौदी अरेबियातील कंपनीशी करारही केला आहे. त्यामुळे प्रकल्पविरोधी वातावरण अधिकच आक्रमक झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रकल्प होत असलेल्या गावांचा दौरा करून तेथील जनतेच्या भावना जाणून घेतल्या. खा. हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील आलेल्या या शिष्टमंडळात माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, आ. हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्‍ते हरीष रोग्ये, अशोक जाधव, रमेश कीर, राजन भोसले, महिला आघाडीच्या आगाशे, अविनाश लाड आदींसह काँग्रेस पदाधिकार्‍यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाने गुरूवारी डोंगर दत्तवाडी तसेच गाव पडवे येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेऊन संवाद साधला. रिफायनरी प्रकल्पाला आमचा ठाम विरोध असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची जमीन शासनाला देणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्‍त केला. 

यावेळी खा. दलवाई यांनी सांगितले की, जर येथील जनतेला हा प्रकल्प नको असेल तर काँग्रेस पक्षही तुमच्या बाजूने या प्रकल्पाच्या विरोधात उभा राहील. प्रकल्पग्रस्तांनी अशीच एकजूट कायम ठेवून प्रकल्पविरोधी लढा सुरू ठेवा, काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या सोबत राहील, अशी ग्वाही दिली. तसेच रिफायनरी प्रकल्पाला सेनेचा असलेला विरोध हा बेगडी असून जर खरोखरच सेनेचा प्रकल्पाला विरोध असेलआणि शिवसेना जनतेच्या बाजूने असेल, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथे सभा घेण्यापूर्वी सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश रद्द करायला लावून नंतरच नाणार येथे सभा घ्यावी, असे आव्हानही दलवाई यांनी दिले आहे.

यावेळी रिफायनरी प्रकल्प विरोधी मुंबई समितीचे अध्यक्ष अशोक वालम, ग्रामीण समितीचे अध्यक्ष ओंकार प्रभुदेसाई, मजिद भाटकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी  हे शिष्टमंडळ नाणार, इंगळवाडी मच्छीमार समाज बांधव, तारळ, चौके, पाळेकरवाडी आदी गावांना भेटी देणार असून तेथील प्रकल्पगस्तांची मते जाणून घेणार आहेत.