Tue, Mar 26, 2019 11:53होमपेज › Konkan › ‘नागपूर’ला उद्या धरणे

‘नागपूर’ला उद्या धरणे

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 09 2018 10:22PMराजापूर : प्रतिनिधी

शंभर टक्के विरोध असताना देखील केंद्र व राज्य शासन नाणार रिफायनरी प्रकल्प लादण्याचे प्रयत्न करीत असल्याने संतप्त झालेल्या  विरोधकांतर्फे बुधवार बुधवार दि. 11 जुलैला नागपूर विधीमंडळाच्या बाहेर एक दिवसाचे धरणे उपोषण हे आंदोलन केले जाणार आहे. त्यासाठी प्रकल्प भागातून असंख्य  महिला व पुरुष उपस्थित राहणार आहेत. ही माहिती कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी 
दिली.

रविवारी मुंबईच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी 17 गावांतील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. गेल्या वर्षाहून अधिक काळ नाणार प्रकल्पावरून मोठा संघर्ष सुरू आहे. शासनाचे कोणत्याही प्रकल्पाबाबत भूसंपादनामध्ये निकष ठरलेले असताना ते डावलून शासनाकडूनच जनतेचा विरोध असतानादेखील प्रकल्प लादले जात असून रिफायनरी प्रकल्प त्यांपैकी एक आहे. 

जमीनदार शेतकर्‍यांचा प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. पण शासन मात्र प्रकल्प रेटण्याच्या तयारीत असल्याने  आजवर अनेक आंदोलने झाली आहेत. त्यामध्ये प्रकल्प परिसरासह मुंबई, नागपूरच्या अधिवेशनांचा सामावेश आहे. पण शासन मात्र एवढा विरोध होऊनदेखील रिफायनरी रद्द करायला तयार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाला जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प लादला जाणार नाही. जनतेशी चर्चा करु, असे आश्‍वासन देत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार सौदी अरेबियाची ‘अराम्को’ व अबुधाबीची डॅनॉक या अरेबियन कंपन्यांशी सामंजस्य करार करुन मोकळे झाले. 

दरम्यान, रविवारी मुंबईतील शिरोडकर हायस्कूलमध्ये आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठक पार पडली. त्यावेळी अशोक वालम यांच्यासह रामचंद्र भडेकर, सत्यजित चव्हाण, नितीन जठार, राजेंद्र 
फातर्पेकर यासह 17 गावांतील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. त्यामुळे आता 11 जुलैच्या नागपूर अधिवेशनादरम्यान रिफायनरीचे आंदोलन पहावयास मिळणार आहे.

प्रकल्पग्रस्तांचा शुद्ध फसवणुकीचा आरोप
ही सर्व प्रकल्पग्रस्तांची शुद्ध फसवणूक असून संतापलेल्या प्रकल्पग्रस्तांनी आता थेट नागपूर अधिवेशनात जाऊन लाक्षणिक धरणे उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, प्रकल्प परिसरातून असंख्य महिला व पुरुष सहभागी होणार आहेत.