Fri, Jul 19, 2019 18:32होमपेज › Konkan › ‘कोकणच्या राजा’ला हापूसचे ‘जीआय’ मानांकन

‘कोकणच्या राजा’ला हापूसचे ‘जीआय’ मानांकन

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:05PMरत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

वातावरणाच्या द‍ृष्टचक्रातून ‘कोकणचा राजा’ जागतिक बाजारपेठेत उजवा ठरताना सातासमुद्रापार जात आहे. आता कोकणच्या आंब्याला  भौगोलिक ओळख (जीआय) देताना त्याच्या हापूसच्या मानांकनावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. त्यामुळे देशातील अन्य आंब्यांशी स्पर्धा असणार्‍या कोकणच्या आंब्याला ‘हापूस’ हे नाव मानाने मिरवता येणार आहे.

कोकणातील कोकम, चिकू आणि काजू या फळांना ‘जीआय’ मानांकन जाहीर झाले होते. मात्र, कोकणचा आंबा ‘जीआय’ मानांकनापासून दूर होता.  देवगड हापूस आंब्याला ‘जीआय’ मानांकन मिळाले होते. मात्र, कोकणातील अन्य भागाप्रमाणेच रत्नागिरी आंब्याचा दर्जा सरस  असतानाही काही तांत्रिक अडचणींमुळे  ‘जीआय’ मानांकनापासून वंचित राहिला होता. 
रत्नागिरी हापूस आंबा जगभर प्रसिद्ध आहे. 

मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे आंब्याला ‘जीआय’ मानांकन  मिळाले नव्हते. रत्नागिरी हापूस आंब्याला बागायतदारांकडूनच काही आक्षेप असल्याने मानांकन देण्यात अडचणी  होत्या. मात्र,  यातून आता ‘कोकणचा राजा’ सुटला असून त्यालाही आता नवी ओळख मिळाली आहे. गेली अनेक वर्षे ही मानांकनाची लढाई  कोकणातील बागायतदार लढत होते. 

कोकणातील आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. मात्र, त्याचा मूळ दर्जा कमी झाला आहे, कोणतीही केमिकल प्रक्रिया न करता तो आंबा नैसर्गिकरित्या तयार होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा दर्जा आणखी वाढेल, यासंदर्भात बागायतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रयत्नांना यश आले असून आता कोकणातील आंबा हा  ‘हापूस’ या मानांकनाने गौरविण्यात येणार आहे. हापूसला ‘जीआय’ मानांकन  मिळावे, यासाठी कोकण कृषी विद्यापीठ, देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस यांच्याकडून प्रस्ताव आले होते. कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या प्रस्तावावर निर्णय अंतिम टप्प्यात होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.