होमपेज › Konkan › शत-प्रतिशत भाजपसाठी ‘संघ’ दक्ष

शत-प्रतिशत भाजपसाठी ‘संघ’ दक्ष

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 9:16PMचिपळूण : सुनील दाभोळे

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचे पुनर्वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप वर्तुळांतर्गत रणनीती आखण्यात येत आहे. एकेकाळी संपूर्ण कोकणावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजप निवडणुकीच्या रणनीतीसाठी ‘दक्ष’ झाल्याचे दिसू लागले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून उमेदवार भाजपने निश्‍चित केला आहे. शिवसेना-भाजप युतीचे संकेत अद्यापही स्पष्ट नाहीत. युतीमधील दरी अधिकच खोलवर रूंदावत चालली आहे. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेता भाजपने देखील कोकणात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. 
लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी साक्षात प्रभू भाजपच्या माध्यमातून रिंगणात उतरणार आहेत. मित्रपक्षासहित भाजप विरोधकही विविध मुद्यांवर टीका, आरोपांची शस्त्रे हातात घेऊन लढ्याला सिद्ध झाले आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर देशात व राज्यात पुन्हा एकदा भाजपची स्वबळावर निर्विवाद सत्ता स्थापण्यासाठी भाजप वर्तुळातून राजकीय रणनीतीला प्रारंभ झाला आहे. त्यानुसार भाजपचे बलस्थान असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत या रणनीतीसाठी घेतली जात आहे. 25 वर्षांपूर्वी कोकणातील संघाची सर्व सूत्रे चिपळुणातून हाताळली जात असत. चिपळूणच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून होणारे निर्णय कोकणातून सर्व संघप्रेमींपर्यंत पोहोचवले जात. संघाचे नेटवर्क संपूर्ण कोकणात पोहोचले होते. परंतु यात सातत्य राहिले नाही. त्याचा फटका भाजपला बसला.

आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा चिपळूणसह कोकणातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपसाठी दक्ष झाला आहे. सत्ता यावी यासाठी संघाचे स्वयंसेवक व प्रचारक सक्रीय झाले आहेत. स्वयंसेवक व प्रचारक खुबीने जनतेत मिसळून अंदाज घेत आहेत. त्यातूनच कच्चे व पक्के दुवे असे वर्गीकरण करणे सुरू झाले आहे. भाजपविरोधी मत मवाळ करून पक्षाला अनुकूल असे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

वर्चस्व राखण्यात अपयश...
सुमारे 25 वर्षांपूर्वी कोकणात संघाचे बलस्थान होते. स्व. प्रेमजीभाई आसर यांच्यासारख्या चिपळुणातील स्वयंसेवकांचा आदर्श येथील संघाने कायमस्वरूपी मनावर ठसवला आहे. तर संगमेश्‍वरनजीकच्या गोळवली गावचे गोळवलकर गुरुजी यांचा देखील आदर्श जपत संघाने कोकणात चांगले बस्तान बसविले होते. त्यानंतर संघ आपल्या अस्तित्त्वासाठी दक्ष न राहिल्याने कोकणातील वर्चस्वाला फाटे फुटले.
 

Tags : konkan, election, bjp