Tue, Apr 23, 2019 08:23होमपेज › Konkan › ‘रनप’ पोटनिवडणूक; तिरंगी लढत

‘रनप’ पोटनिवडणूक; तिरंगी लढत

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 9:20PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादीने रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. 3 च्या पोटनिवडणुकीसाठी सनिफ गवाणकर यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. काँग्रेसकडून उमेदवार देण्याबाबतच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार आहे. शिवसेनेकडून राजन शेट्ये आणि भाजपकडून वसंत पाटील यांची उमेदवारी या पूर्वीच निश्‍चित झाली आहेत.

शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवक राजेश सावंत यांचे सेना नेतृत्वासोबत मतभेद निर्माण झाले. हे मतभेद टोकावर पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम शिवसेनेच्या उपनगराध्यक्षपदाचा आणि 15 जानेवारी रोजी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे प्रभाग क्र. 3 ची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी दि. 6 एप्रिल रोजी मतदान आणि 7 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे राजेश सावंत यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. शिवसेनेने माजी उपनगराध्यक्ष राजन शेट्ये यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे.  त्याचवेळी भाजपने वसंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्धार केल्यानंतर या दोन्ही पक्षांकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू झाला.

राष्ट्रवादीकडून चाचपणीनंतर उमेदवारी 
एकीकडे शिवसेना, भाजपचे उमेदवार निश्‍चित झाले असतानाच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गोटात मात्र शांतता होती. रविवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि इच्छुक उमेदवारांची चाचपणी होऊन सनिफ गवाणकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुदस्सर ठाकूर हेही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते.