Mon, Jan 27, 2020 12:06होमपेज › Konkan › कोकणातील मत्स्य बीज प्रकल्प चेन्‍नईत

कोकणातील मत्स्य बीज प्रकल्प चेन्‍नईत

Published On: May 11 2019 2:04AM | Last Updated: May 10 2019 11:23PM
रत्नागिरी : राजेंद्र पाष्टे

कोकणातील सागरी समृद्धीला बळ देणारे सागरी क्षेत्रातील शिंपले आणि कालवं मत्स्य बीज संशोधन प्रकल्प चेन्‍नईतील राजीव गांधी सागरी जीव संशोेधन केंद्राकडे वळविण्याचा घाट घालण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प आता चेन्‍नईत राबविण्यात येणार आहे.

कोकण किनारपट्टी भागात असलेल्या सागरी समृद्धीला  वैज्ञानिक पाठबळ मिळावे आणि या क्षेत्रातील सागरीजीव संशोधन करून समुद्री उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प कोकणात राबवण्यात येणार होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत सागरी क्षेत्रातील शिंपले व कालवं मत्स्य बीज निर्मिती संवर्धन प्रकल्पाला दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे केंद्र शासनाचा हा प्रकल्प आता चेन्‍नईतील राजीव गांधी सागरी जीवशास्त्रीय केंद्राकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

केंद्र शासनातर्फे उभारण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी येथे पायाभूत सुविधांसाठी दीड कोटीचा निधीही मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाद्वारे येथील मत्स्यबीज निर्मितीला चालना मिळणार होती. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून  सागरी क्षेत्रात निर्यातीचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार होती. कोकण किनारपट्टी भागात या प्रकल्पासाठी अनुकूलता असतानाही शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका या प्रकल्पाला बसला असल्याची माहिती येथील मत्स्य महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

मत्स्य महाविद्यालयाबाबतही हीच धोरणे राबवल्याने हे केंद्रही मराठवाड्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता कोकणातील पर्यावरणपूरक प्रकल्पही दुसर्‍या राज्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.  यासाठी या प्रकल्पाला देण्यात आलेली प्रशासकीय मान्यताही रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.