Thu, Jun 27, 2019 09:46होमपेज › Konkan › कोळंब पूल दुरुस्तीस अखेर मिळाला मुहूर्त!

कोळंब पूल दुरुस्तीस अखेर मिळाला मुहूर्त!

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 16 2017 8:08PM

बुकमार्क करा

मालवण : वार्ताहर

धोकादायक कोळंब पुलाच्या दुरुस्तीस वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठाणे येथील मे. इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रोवेंचुयर या कंपनीची 4 कोटी 45 लाख रुपये खर्चाची निविदा वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाल्याची माहिती उपविभागीय अभियंता प्रकाश चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, पुलाच्या दुरुस्तीचा कालावधी वर्षभर राहणार असून ओझर-कातवड या पर्यायी मार्गा बरोबर कोळंब-निव्हे-आडारी या पर्यायी मार्गाचा वापर मालवण शहराला जोडण्यासाठी केला जाणार आहे. मात्र हा रस्ता जि.प.विभागाकडे येत असल्याने जिल्हाधिकारी या रस्त्याच्या डागडुजीच्या निधिबाबत निर्णय घेणार आहेत,असेही चव्हाण यांनी सांगितले.

धोकादायक कोळंब पुलावरुन वर्षभर अवजड वाहतूक बंद आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी आ. वैभव नाईक व आ. नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत मच्छीमार नेते गोपीनाथ तांडेल यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन करून जनआंदोलन उभारले होते. तर आमदार वैभव नाईक यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, पुलाच्या दुरुस्ती निविदाना अल्प प्रतिसाद मिळत असल्याने पुलाची दुरुस्ती रखडली होती. आता जीएस्टीसह 4 कोटी 45 लाख खर्चाची निविदा मंजूर करून ठेकेदार निश्‍चित झाल्याने पुलाच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ठेकेदाराने अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया येत्या आठवडा भरात पूर्ण केल्यानंतर पूल दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रकाश चव्हाण यांनी दिली.

काही दिवस पूर्ण वाहतूक बंद 

दुरुस्तीचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या अभियंत्यांनी दोन दिवसांपूर्वी पुलाची पाहणी केली. दुरुस्तीचे साहित्य मोठमोठ्या मशनरी उतरवण्याची जागा याचीही पाहणी करण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्तीदरम्यान मोठे बेरिंग बदलणे व दुरुस्ती यासाठी काही दिवस पुलावरून सायकल वाहतूकही बंद ठेवली जाणार आहे. मात्र, तो कालावधी नेमका कोणता असणार याबाबत अद्याप निश्‍चिती झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

नवीन पूलही प्रस्तावित

कोळंब पूल असलेला मार्ग राष्ट्रीय सागरी महामार्ग म्हणून प्रस्तावित आहे. या मार्गाचे काम सुरू झाल्यास मोठ्या स्वरुपात नवा पूल बांधला जाणार आहे. त्यासाठीही सुमारे 14 कोटींचा आराखडा प्राथमिक स्तरावर बनवण्यात आला आहे.