वैभववाडी : प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी कोकिसरे महालक्ष्मी मंदिराला ग्रामस्थांनी ठोकलेले टाळे गावातील दुसर्या गटाने उघडून मंदिर खुले केल्याच्या निषेधार्थ कोकिसरे ग्रामस्थांनी वैभववाडी-तळेरे महामार्गावर पोलिस स्टेशनसमोर रास्ता रोको करत तब्बल दोन तास वाहतूक रोखली. महालक्ष्मी मातेचा विजय असो...टाळे फोडणार्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याशिवाय आम्ही उठणार नाही, अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी ग्रामस्थ व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, वैभववाडीचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाखारे यांनी मध्यस्थी करीत रस्त्यावर बसून प्रश्न सुटणार नाही. आमच्या अखत्यारित हा विषय नाही. तुमचे प्रश्न मिटविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर कोकिसरे ग्रामस्थांनी रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
कोकिसरे महालक्ष्मी मंदिराचे टाळे गावातील एका गटाने उघडून मंदिर खुले केले आहे. दरम्यान, दुसर्या गटातील गावकर्यांनी या प्रकाराच्या विरोधात वैभववाडी पोलिसांत टाळे खोलणार्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली. परंतु, हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने तहसीलदारांनी यावर योग्य ती कारवाई करावी, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या मे महिन्यात गुरव पुजार्याने एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत गावकर्यांनी मंदिराला टाळे ठोकले होते. दरम्यान, तहसीलदार
संतोष जाधव यांनी दोन्ही गटांना बोलवत बैठक घेतली होती. मात्र, दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. रविवारी गुरव गटाने टाळे उघडून मंदिरात प्रवेश केला. त्यामुळे गावकर्यांनी या प्रकाराच्या विरोधात पोलिस ठाणे गाठले. अखेर सोमवारी सकाळी 11 वा. वाजण्याच्या सुमारास कोकीसरे येथील सुमारे दोनशे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. विशेषतः मोर्चात महिलांचा लक्षणीय समावेश होता. तहसीलदार संतोष जाधव यांनी आपण गावात येऊन याबाबत चर्चा करतो, असे सांगितले. मात्र, त्यांनी ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी दुपारी 1.30 वा. सुमारास पोलिस स्टेशनसमोर तळेरे-वैभववाडी मार्गावर सुमारे दोन तास मार्ग रोखून धरला. दरम्यान, मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ओरोसवर जादा पोलिस कुमक मागवली. दरम्यान, पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी आंदोलनकर्यांची समजूत काढून मार्ग मोकळा करण्याची विनंती केली. त्यानंतर मार्ग मोकळा झाला. संध्याकाळी तहसीलदार जाधव कोकिसरे येथे ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत.