Sat, Jul 20, 2019 15:38होमपेज › Konkan › खेड सेनेचा बीएसएनएलवर हल्लाबोल

खेड सेनेचा बीएसएनएलवर हल्लाबोल

Published On: Mar 09 2018 11:29PM | Last Updated: Mar 09 2018 9:33PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील भारत संचार निगमच्या सतत खंडीत होणार्‍या सेवेबद्दल नागरिकांमध्ये नाराजी असून शुक्रवार दि.9 मार्च रोजी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी येथील भारत संचार निगमच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आगामी काळात सेवा न सुधारल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

खेड शिवसेना व युवा सेना कार्यकर्त्यांनी भारत संचार निगमच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर,नगरसेवक प्रज्योत तोडकरी, सीमा वंडकर, नम्रता वडके, अल्पिका पाटणे, कुंदन सातपुते,  युवा सेना तालुका अधिकारी अजिंक्य मोरे, महिला आघाडी शहर संघटक माधवी बुटाला, युवा सेना शहर अधिकारी रेशम पाटणे, शिवसेना उपशहर प्रमुख प्रेमल चिखले, युवासेना शहर सचिव प्रसाद पाटणे, मोहाने-ऐनवली युवा सेना शाखा अधिकारी सचिन शिंदे आदींसह शिवसेना व युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारत संचार निगमच्या कार्यालयाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

बीएसएनएलची भ्रमणध्वनी व इंटरनेट सेवा नागरिकांनी पैसे भरून देखील मिळत नसेल तर यापुढे कार्यालयाला टाळे ठोकून वरिष्ठ अधिकार्‍यांना खेडमध्ये येण्यास भाग पाडू असा इशारा देण्यात आला. यावेळी सेवा सुधारण्याबाबत भारत संचार निगमला निवेदन देण्यात आले.