Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Konkan › खवटी येथील बेपत्ता मुलाचा खून

खवटी येथील बेपत्ता मुलाचा खून

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:02PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील खवटी धनगरवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या मात्र कुटुंबीयांसह मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्य असलेला अल्पवयीन मुलगा प्रवीण बाबू झोरे (वय 15) हा गावी आला असता दि.26 मे रोजी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला होता. मात्र, चौकशीदरम्यान या मुलाचा पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दि. 30 मे रोजी खेड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात अपहणाचा गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता त्यांनी प्रवीणचा खून करून मृतदेह कशेडी घाटात टाकल्याची कबुली दिली आहे. संशयितांना पोलिसांनी  शनिवारी (दि. 23) अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दि.27 पर्यंत पोलिस कोठडी दिली.

खवटी धनगरवाडी येथील रहिवासी असलेले मात्र मुंबईतील घाटकोपर येथे वास्तव्य असलेले बाबू पांडुरंग झोरे यांनी त्यांचा मुलगा प्रवीण (15) हा दि.26 मेपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.

पोलिस तपास सुरू असतानाच बाबू झोरे व त्याच्या नात्यातील घाटकोपर येथील जुन्या रमाई कॉलनीत राहणार्‍या काही मंडळींचे  आर्थिक वादातून भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक गंभीर यांनी रमेश धोंडू झोरे (30), विलास महादेव झोरे (19), संदीप चंद्रकांत ढेबे (26) व नीलेश अनंत आखाडे (19) यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपण प्रवीणचा खून केल्याची कबुली दिली आहे. 

संशयितांपैकी रमेश झोरे, विलास झोरे, संदीप ढेबे व नीलेश आखाडे यांनी प्रवीणला दि.26 मे रोजी घरातून बाहेर बोलावून घेतले व त्याचा खवटी गावानजीकच्या आंब्याचा माळ परिसरात गळा दाबून खून केला व मृतदेह तेथेच फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, संशयितांनी पोलिस मृतदेहापर्यंत पोहोचतील, या भीतीने प्रवीणचा मृतदेह पिशवीत भरून कशेडी घाटातील  जंगलमय दरीच्या भागात टाकला होता. तेथून प्रवीणच्या मृतदेहाचे अवशेष पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.