Wed, Mar 27, 2019 00:26होमपेज › Konkan › ब्रेक निकामी होऊन एसटीला अपघात

ब्रेक निकामी होऊन एसटीला अपघात

Published On: Apr 08 2018 10:41PM | Last Updated: Apr 08 2018 9:39PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील वाडी जैतापूर येथून खेडच्या दिशेने रविवार, दि.8 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणार्‍या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने धाकटे मांडवे गावानजीक बस रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडली. या अपघातात चालकासह तिघेजण गंभीर जखमी तर  नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर चिपळूण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाडी जैतापूर येथून प्रवासी घेऊन रविवार, दि. 8 रोजी बस खेडला येण्यासाठी दुपारी 1 च्या सुमारास निघाली.  चालक दीपक पार्टे (50,रा. बोरघर, ता. खेड) यांनी मांडवे गावाजवळून उतारात बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबले असता ते निकामी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चालक पार्टे यांना काही समजण्यापूर्वीच बस दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर रस्ता सोडून बाजूला  नेली. 

या अपघातात चालक पार्टे बसच्या स्टेअरींग जवळच अडकून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नजीकच्या ग्रामस्थांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालक पार्टे यांना बाहेर काढले. घटनास्थळावरून जखमींना शासनाच्या 108 या आपत्कालीन रूग्णवाहिकांनी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बसचे वाहक सचिन माने (34, रा.खेड), प्रवासी शेवंती कदम (46, रा. शिंगरी), काशिराम कासार (70), वंदना शेलार (50), रमेश रेवणे, भागोजी शेलार (21), बबन चव्हाण (58), रंजना जाधव (43), मनिषा बांद्रे (35, सर्व रा. वाडी जैतापूर) आदी जखमींवर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस कर्मचारी सी. टी. कांबळे यांनी पंचनामा केला.