Wed, Apr 24, 2019 00:17होमपेज › Konkan › खेडमध्ये अपघातांचे सत्र

खेडमध्ये अपघातांचे सत्र

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 20 2018 10:23PMखेड : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील लवेल-असगणी गावानजीक आंजणी रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला दि.19 रोजी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास दुचाकी व मोटारीचा अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले. त्यांना चिपळूण येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खेड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा या अपघाताची नोंद झाली आहे. 

खेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संजय गणपत शिंदे (वय47, रा.बोरिवली पूर्व,मुंबई) हे इंडिका व्हीस्टा (एमएच 02 सीडी 8994) घेऊन दि.19 रोजी बोरीवली येथून कणकवलीला जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील लवेल गावानजीक त्यांची मोटार आली असता पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच 08 एएम 6322) ने त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीची मोटारीच्या बाजूला धडक बसली. या अपघातात रोहीदास हरिश्‍चंद्र पांचाळ (वय49,रा.बोरीवली) व जंगबहाद्दूर कौरव यादव (वय36,रा.बोरीवली) हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मोटार चालक शिंदे यांनी दिल्यानंतर अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दाभिळ अपघातात सात जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दाभिळ गावानजीक समोरील वाहनाची बाजू काढण्याच्या प्रयत्नात मारूती मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून मोटार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात सात जण जखमी झाले. अपघात शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात झालेली नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दाभिळ गावानजीक शुक्रवार दि.18 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ठाणे येथून चिपळूणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी मारूती स्विफ्ट मोटार (एमएच 04 सीव्ही 0833) समोरील वाहनाची बाजू काढण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. या अपघातात मोटारीतून प्रवास करणारे ठाणे येथे वास्तव्यास असलेले सात जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला, चार लहान मुले व चालकाचा समावेश आहे. जखमींना (नावे समजू शकली नाही) चिपळूण व खेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद खेड पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही.