Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Konkan › जगबुडी पुलावरील वाहतूक कितीवेळा बंद करणार?

जगबुडी पुलावरील वाहतूक कितीवेळा बंद करणार?

Published On: Jul 11 2018 10:21PM | Last Updated: Jul 11 2018 10:11PMखेड : प्रतिनिधी

गेले चार दिवस सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे आतापर्यंत दोनवेळा तब्बल 14 तास वाहतूक ठप्प झाली. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना जगबुडीचा नवा पूल कधी होणार हा प्रश्‍न आहे. सावित्री नदीवरील पूल अपघातानंतर सहा महिन्यांत पूर्ण होतो. मात्र, महामार्गावर ये-जा करण्यासाठी भरणे येथे एकच पूल असताना या पुलाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न मुंबई ते गोवा प्रवास करणारे प्रवासी विचारत आहेत.

चौपदरीकरण अंतर्गत जगबुडीवरील नवीन पुलाचे काम बहुतांशी झाले आहे. ते पूर्ण करून हा पुल वाहतुकीसाठी मोकळा का केला जात नाही. असाच प्रश्‍न सर्वांसमोर उभा आहे. या प्रकरणी नवीन पुलाचे नेमके त्रांगडे काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या एका अधिकार्‍याने अशी माहिती दिली की, प्रशासनाची  कागदपत्रांची पूर्तता व पुलाच्या दोन्ही बाजूला रखडलेले भूसंपादन या बाबींमुळे या नवीन पुलावरून वाहतूक करणे शक्य नाही. ज्याप्रमाणे ठेकेदाराने काम केले पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे  त्याला शासनामार्फत पैसे अदा करण्यात आलेले नाहीत. तरी देखील त्या संबंधित कंपनीने हे काम पूर्ण केले. 

या पुलाचे काम 95 टक्के पूर्ण झाले असून फक्त व्हेअरिंग कोट देणे बाकी आहे. परंतु, पुलाच्या दोन्ही बाजूला जे ग्रामस्थ आहेत त्यांना भूसंपादन प्रक्रियेतील सर्व मोबदल्याचे वाटप झालेले असतानादेखील काही छोट्या- मोठ्या बाबीमुळे ते जमिनी ताब्यात देताना विरोध करीत आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला भराव करण्याचे काम अद्यापही अडकले आहे.

जगबुडी नदीला पूर आल्यानंतर  सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद करण्यात येते. पुलावरील वाहतूक बंद करून कुणालाही त्रास देण्याचा उद्देश नाही. कोकणात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. या ठिकाणी असलेल्या जगबुडी नदीवरील हा पूल ब्रिटिशकालीन आहे.

ज्यावेळी अतिवृष्टीत नदीला पूर येतो आणि पुलावरुन वाहतूक सुरू असते त्यावेळी पूल अधिक प्रमाणात कंप पावतो. त्यावेळी पुलाला धोका उद्भवू शकतो. अशावेळी राष्ट्रीय बांधकामच्या अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करतो, अशी माहिती प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली.