Fri, Apr 26, 2019 16:05होमपेज › Konkan › शहिदांच्या स्मृती जपणार ‘लढाऊ विमान’

शहिदांच्या स्मृती जपणार ‘लढाऊ विमान’

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 12 2018 10:24PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील शिवतर येथील शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जपण्यासाठी खेडमधील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात सैन्याच्या हवाई दलातील टीटीएलई एचपीटी-32 हे लढाऊ विमान बसविण्यात येणार आहे. तरूणांना सैन्यामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळावी, या हेतूने हा प्रकल्प साकारणार आहे. लवकरच हे विमान नागरिकांना पाहता येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली आहे.

तालुक्यातील शिवतर गावातील शूरवीरांनी पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशकाळात सैन्य दलात सेवा बजावताना प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या त्या बलिदानानंतर ब्रिटिश सरकारने येथील ग्रामस्थांच्या विनंतीनुसार सन 1940 मध्ये खेड नगरपालिकेची स्थापना केली. गेल्या कित्येक पिढ्यांत या शूर सैनिकांमुळे तालुक्यातील अनेकांना सैन्यात सहभागी होऊन देशसेवेची प्रेरणा मिळाली आहे. ब्रिटिशांनी शिवतरच्या शूरवीरांच्या स्मरणार्थ शिवतर येथे वीरस्तंभ उभारला असला तरी त्यानंतर  या वीरांचा इतिहास जगासमोर आला नाही. काही वर्षांपूर्वी हा विषय समजल्यानंतर खेड नगरपालिकेमार्फत या शौर्यगाथेला उजाळा देण्यासोबतच भविष्यात तरूणांना सैन्यात सेवा करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून स्मारक उभारण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या प्रयत्नांना यश आले असून आगामी काही दिवसांतच सैन्याच्या हवाई दलातील टीटीएलई एचपीटी-32 हे विमान खेडमध्ये येणार आहे. 

खेड तालुक्यातील शिवतर गाव हे खर्‍या अर्थाने ‘फौजी’ शिवतर आहे. या गावाला शेकडो वर्षांचा सैनिकी वारसा असून ब्रिटिश काळापासूनच या गावातील शेकडो लोकांनी सैन्यदलात सेवा बजावली आहे. ब्रिटिश काळात झालेल्या पहिल्या व दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सैन्यातून लढताना शिवतरमधील सुमारे दोनशेहून अधिक  ग्रामस्थांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. सैन्यात गाजवलेल्या कामगिरीसाठी अनेक शिवतरवासियांना ब्रिटिश सरकारकडून व्हिक्टोरिया क्रॉससह अनेक सेना पदके मिळाली आहेत. शिवतरची शौर्यगाथा ब्रिटिशपूर्व काळापासून सुरू होऊन स्वातंत्र्योत्तर काळात देखील सैन्यदलात शिवतर गावातील शेकडो वीर जवानांनी दाखल होऊन शौर्य गाजवले 
आहे. 

भारत-पाक, भारत-चीन युद्धामध्ये अनेक पदके शिवतर गावातील सैनिकांनी मिळवली. ब्रिटिश काळात शिवतरच्या शूरवीरांनी गाजवलेल्या शौर्याच्या व दिलेल्या बलिदानाच्या ऋणानुबंध जोपासून ब्रिटिशांनी शिवतरवासियांना विचारूनच त्यांच्या मागणीप्रमाणे खेड नगरपरिषदेची सन 1940 मध्ये स्थापना केली. परंतु, त्यांची म्हणावी तशी दखल भारत सरकारने घेतली नव्हती. परंतु, काही वर्षांपूर्वी माध्यमांनी शिवतर गावची शौर्यगाथा जगासमोर मांडण्यास सुरुवात केली. माजी सैनिकांच्या संघटनेने देखील गावात अनेक उपक्रम राबवत सेवानिवृत्त सैनिकांची सेवा करण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी गेल्या काही वर्षांपासून शिवतरच्या शौर्य गाथेच्या स्मरणार्थ व भावी पिढीला प्रेरणा देईल असे स्मारक उभे रहाव,े यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याचाच भाग म्हणून सैन्य दलातून निवृत्त झालेले एखादे विमान व रणगाडा खेडमध्ये मिळावा यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. सोमवार दि.11 रोजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, शिवतर गावच्या वीरांच्या शौर्यगाथेचा संदर्भ देऊन आम्ही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. दि.7 रोजी खेड येथे प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसविण्यासाठी लढाऊ विमान पालिकेला देण्यात येत असल्याचे पत्र वायुसेनेकडून पाठविण्यात आले आहे. 

वायुसेनेकडून देण्यात येत असलेल्या विमानाचा प्रकार टीटीएलई एचपीटी-32 हा असून ते बसविण्याची पालिकेने तातडीने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांमध्येच खेडमध्ये हे विमान दाखल होईल. विमान बसविण्यासाठी शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात विशेष तयारी करण्यास सुरवात झाली आहे. आगामी काही दिवसांमध्येच विमान उभे करण्यासाठी पायाभूत बाबींचे बांधकाम पूर्ण करून सज्ज ठेवण्यात येईल. त्यासाठी नगराध्यक्ष म्हणून तातडीच्या बाबींसाठी निधी खर्च करण्याच्या माझ्या अधिकारांचा मी वापर करत आहे. या विमान व परिसरात उभारण्यात येणार्‍या स्मारकामुळे खेडमध्ये येणार्‍या पर्यटकांना भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण देखील तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे बांधकाम लिपीक नागेश बोंडले यांच्यासह ठेकेदार हनुमंत जाधव, निवृत्त अभियंता पी. चिदंबरम आदी उपस्थित होते.