Wed, Mar 27, 2019 05:56होमपेज › Konkan › अखेर सत्य उघड : वैभव खेडेकर

अखेर सत्य उघड : वैभव खेडेकर

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 10:16PMखेड : प्रतिनिधी

अखेर सत्य उघड झाले असून पालिकेला संरक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या लढाऊ विमानाचे केवळ श्रेय घेण्यासाठी शिवसेनेकडून रचलेल्या षड्यंत्राचा पर्दाफाश झाला आहे. शुक्रवारी रात्री 9.30 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक व संरक्षण विभागाच्या आदेशानुसार विमान नेणार्‍यांनीच विमान पालिकेच्या स्वाधीन केले आहे. या विमानाचा आम्ही स्वीकार केला असला तरी या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी व्हावी, ही आमची मागणी सुरूच राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी सायंकाळी बोलवलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शनिवारी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेला पालिकेतील शहर विकास आघाडीचे गटनेते अजय माने यांच्यासह नंदू साळवी, राजेश जोयसर, बाबू नांदगावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खेडेकर म्हणाले, खेड नगर परिषदेला संरक्षण विभागाकडून प्राप्त झालेले विमान षड्यंत्र करून परस्पर ताब्यात घेण्याचा घाट शिवसेनेकडून करण्यात आला होता. परंतु, केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या लोकांच्या या षड्यंत्रावर आम्ही मात केली असून संरक्षण विभाग व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने संबंधितांना शुक्रवारी विमान पालिकेच्या ताब्यात द्यावे लागले आहे. आम्ही विमान ताब्यात घेऊन पालिकेच्या अग्निशमन केंद्रात सुरक्षित ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली.

या घटनेनंतर आता सत्य जगासमोर आले आहे. आणि त्यासोबतच एका षड्यंत्राचादेखील पर्दाफाश झाला आहे. सत्तेचा दुरूपयोग करून दि.16 जुन रोजी ईदची सुट्टी असतानादेखील केदार बुरांडे या संरक्षण राज्य मंत्र्यांच्या कार्यालयात ‘ओएसडी’ पदावर काम करणार्‍या माणसाला डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव करून पालिकेला पत्र देण्यात आले होते. ही अतिशय गंभीर बाब असून आम्ही त्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहोत, असे खेडेकर यांनी सांगितले.

या पुढे पालिकेच्या कामांतील कोणत्याही गोष्टीचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर ही पत्रकार परिषद हा पहिला भाग आहे, हे लक्षात ठेवावे. यापुढे असा प्रकार घडल्यास खेडच्या जनतेच्या भावना ज्यांनी दुखावल्या आहेत त्यांना जनतेला उत्तर द्यावी लागतील, असेही नगराध्यक्ष म्हणाले.